Monday, November 18, 2024
Homeनगरप्रचाराच्या तोफा आज थंडवणार!

प्रचाराच्या तोफा आज थंडवणार!

12 मतदारसंघात चुरस || राजकीय नेत्यांचे दिवाळीनंतर आरोपांचे फटाके

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अवघ्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख सामना रंगला आहे. याशिवाय काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, मनसे यांच्यामुळे लढत बहुरंगी झाली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी अपक्ष आणि बंडखोरांचंही तगडं आव्हान आहे. दरम्यान, गेल्या 15 दिवसात दिवाळीनंतर राजकीय नेत्यांनी जिल्ह्याच्या रणसंग्रामात राजकीय फटाके फोडत विरोधकांवर तोफा डागल्या. या जाहीर प्रचाराची आज सायंकाळी सांगता होणार आहे.

- Advertisement -

नगर राज्यातील विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला असून विशेषतः यंदा माध्यमांसह सोशल मीडियावर प्रचाराचा जोर दिसून आला. विधानसभेच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून रविवारी जिल्ह्या प्रचाराचा सुपर संडे दिसून आला. यात पदयात्रा, कॉर्नरसभा व जेवणावळीला ऊत आल्याचे चित्र चोहीकडे होते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या 288 इतकी असून, सत्तास्थापनेसाठी 145 हा बहुमताचा आकडा गाठणे गरजेचे आहे. यामुळे सर्वच पक्षाचे नेते आपल्या अन् मित्रपक्षाच्या जागा कशा वाढतील यासाठी रात्रंदिवस प्रचारात गुंग असल्याचे दिसत आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागा असून याठिकाणी महायुती की महाविकास आघाडी सर्वाधिक जागा घेणार यावर राज्याचे सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे. जिल्ह्यातील काही मतदारसंघात अपक्ष चमत्कार घडवणार असून काही ठिकाणी हे अपक्ष कोणाला दणका देत घराचा रस्ता दाखवणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

गेल्या 15 दिवसात नगर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोमाने प्रचार यंत्रणा राबवित जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील गावन गाव, वाडी-वस्ती, शेतकर्‍यांचे बांध, शहरातील प्रत्येक गल्लीबोळ पिंजून काढत जाहीर सभेत आपणच कसे योग्य उमेदवार हे मतदारांना समजावून सांगत विरोधकांवर टीकेची झोड उठवतांना दिसले. एकंदरीत, सर्वच पक्षाच्या नेत्यांना विजयासाठी जोरदार प्रयत्न केलेले असून यामुळेच आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. बधुवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल घोषित होतील. यंदाच्या निवडणुकीत कोणता पक्ष सत्तेत येणार, कोणाच्या पदरात मुख्यमंत्री पद पडणार, हे पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत. यात नगर जिल्ह्याचा किती वाटा राहणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये यंदा जोरदार लढत दिसत आहे. मागील पाच वर्षात पक्ष, पदांसह सत्ताही बदलली आणि अनेक मोठे राजकीय बदल घडामोडी दिसून आल्या; यामुळे आगामी निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय चित्र कसे राहील? याबाबत नाना प्रकारचे अंदाज लोक बांधू लागले आहे. दुसरीकडे निवडणूक यंत्रणा, जिल्हा प्रशासन मतदान घेण्यासाठी सज्ज झाली आहे. मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळ, मतदान यंत्रणा, बंदोबस्त विविध पथके, प्रमुख शहरात सुरू असणारी नाकेबंदी यामाध्यमातून निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणूका पारपडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यांनी गावजल्या सभा
भाजपच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. रावसाहेब दानवे, ठाकरे गटाच्यावतीने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खा. संजय राऊत, काँग्रेसच्यावतीने प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, शिवसेना शिंदे गटाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनजंय मुंडे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यासह धर्मजागरण सभेचे कालिचरण महाराज, तसेच अन्य नेत्यांच्या सभा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांत झाल्या. यावेळी त्यांनी केलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगली राजकीय जुगलबंदी पहावयास मिळाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या