Tuesday, October 22, 2024
Homeनगरशरद पवार-ठाकरे गटात नगर, पारनेर, श्रीगोंद्यावरून रस्सीखेच

शरद पवार-ठाकरे गटात नगर, पारनेर, श्रीगोंद्यावरून रस्सीखेच

मोठ्या पवारांचा संपूर्ण नगर दक्षिणेवर दावा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभा निवडणुकीसाठी आज मंगळवारपासून (दि.22) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होत आहे. महायुतीमधील भाजपचे जिल्ह्यात पाच उमेदवार जाहीर झालेले आहेत तर महाविकास आघाडीच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा होण्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता असून नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघांवर शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. तर यातील नगर शहर, पारनेर आणि श्रीगोंदा मतदारसंघासाठी उध्दव ठाकरे यांची शिवसेना आग्रही असून यामुळे नगर दक्षिणेत कोणाच्या वाट्याला कोणती जागा जाणार याकडे सर्वांच्या नजरा राहणार आहेत.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत जिल्ह्यावरील आपले वर्चस्व सिध्द केले होते. मात्र, त्यानंतर दुभंगलेली राष्ट्रवादी, लोकसभा निवडणुकीचा निकाल यामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरण बदलल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर देखील विशेष करून नगर दक्षिणेत राष्ट्रवादीच्या मोठ्या पवारांचे राजकीय वर्चस्व टिकून असल्याचे दिसत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत नगर दक्षिणेतील नगर शहर, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड या सहाही मतदारसंघांत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे.

यामुळे नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोठी अडचण होणार आहे. नगर शहरासह पारनेर, श्रीगांदा मतदारसंघासाठी शिवसनेचा ठाकरे गट लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून आग्रही आहे. लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची आणि आघाडी धर्म पाळल्यामुळे त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी नगर शहर, पारनेर आणि श्रीगोंदा मतदारसंघ सोडण्यास तयार नाही. यामुळे नगर दक्षिणेत महाविकास आघाडीतील ठाकरे यांच्या शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात शरद पवार गटाच्या उमेदवारांची आज घोषणा होण्याची शक्यता सुत्रांकडून देण्यात आली. यात पारनेर आणि श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीच्या मोठ्या पवारांचे उमेदवार फायनल झाल्याचे सांगण्यात आले आहे. आता केवळ नगर शहराचा तिढा कायम असून तो आज सकाळपर्यंत सुटणार असल्याचे सांगण्यात आले.

महाविकास आघाडीत बंडखोरी ?
नगर दक्षिणेत महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. नगर जिल्ह्यात महायुतीमधील भाजपचे आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर काही मतदारसंघात बंडखोरीची घोषणा झालेली आहे. अशीच बंडखोरी महाविकास आघाडीत होण्याची शक्यता आहे. विशेष करून नगर शहरात आणि पारनेर आणि श्रीगोंद्यात ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक बंडाचा झेेंडा फडकवण्याच्या तयारी आहेत. तसेच झाल्यास या बंडखोरीचा फायदा कोणाला होणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

मुलाखत पवारांसमोर आणि उमेदवारी वंचितकडून
श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून इच्छुक असणारे बेलवंडीचे ओबीसी नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादीच्या मुलाखती दरम्यान हजर राहत श्रीगोंद्यातून उमेदवारीची मागणी केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, सोमवारी शेलार यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या