Wednesday, November 20, 2024
Homeनगरजिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागांसाठी आज मतदान

जिल्ह्यात विधानसभेच्या 12 जागांसाठी आज मतदान

151 उमेदवार निवडणूक रिंगणात, अनेक ठिकाणी बहुरंगी लढती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरसह राज्यात महिनाभरापासून सुरू असलेला विधानसभा निवडणुकीचा धुराळा सोमवार (दि.19) रोजी सांयकाळी शांत झाला. त्यानंतर काल मंगळवारी सकाळीच जिल्ह्यातील निवडणुका असणार्‍या मतदारसंघातील प्रचार साहित्य, मतदान यंत्रे, आवश्यक स्टेशनरी घेऊन मतदान कर्मचारी, पोलीस बंदोबस्तासह मतदान केंद्राकडे रवाना झाले. आज मतदार राजा आपल्या मताचे दान करणार असून मतदान शांततापूर्ण, निर्भय आणि निपक्ष वातावरणात पार पडावे, यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतदान यंत्रे सील करून त्या त्या विधानसभेसाठी निश्चित केलेल्या मतमोजणी ठिकाणी रवाना करण्यात येणार आहेत. त्याठिकाणी पोलीस संरक्षण आणि सीसीटीव्हीच्या निगराणीत मतदान यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर शनिवारी (दि. 23) सकाळीच मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारपर्यंत अनेक मतदारसंघांतील कल स्पष्ट होणार असून यंदाच्या विधानसभेत कोण आमदार म्हणून जाणार हे समोर येणार आहे. साधारण सात महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर खर्‍याअर्थाने निवडणुकीच्या कामाला वेग आला होता.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात जवळपास सर्वच मतदारसंघांत चुरशीच्या लढती होत असून यात अनेक ठिकाणी तीन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे त्याठिकाणी कोण बाजी मारणार, कोणाला पराभवाला समोरे जावे लागणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. नगर जिल्ह्यात 151 उमेदवार निवडणूक रिंगणात असून उमेवारी मागे घेण्याच्या दिवशी 4 नोव्हेंबरला जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले होते. त्यानुसार जिल्ह्यात अकोले 9, संगमनेर 13, शिर्डी 8, कोपरगाव 12, नेवासा 12, श्रीरामपूर 16, शेवगाव 15, राहुरी 13, पारनेर 12, नगर शहर 14 व कर्जत-जामखेड 11 आणि श्रीगोंदा 16 असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

दरम्यान, जाहीर प्रचार संपल्यानंतर सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा छुपा प्रचार सुरू होता. जिल्ह्यात अकोले, राहुरी, श्रीरामपूर, श्रीगोंदा, पारनेर, नेवासा, शेवगाव-पाथर्डी या मतदारसंघात बहुरंगी लढती आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रचाराच्या रणांगणावर भाजपच्यावतीने पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. रावसाहेब दानवे, ठाकरे गटाच्यावतीने माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खा.संजय राऊत, काँग्रेसच्यावतीने प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना शिंदे गटाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा.अमोल कोल्हे, राष्ट्रवादीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपाइंच्या रामदास आठवले यांच्यासह अन्य नेत्यांच्या तोफा धडाडल्या. यामुळे निवडणुकीच्या प्रचारातील रंगत वाढत गेली.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न
यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग, स्वीप समितीच्यावतीने जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. यासाठी विविध उपक्रम, स्पर्धा, आयोजित करण्यात आल्या होत्या. शासकीय यंत्रणेसोबत स्वयंसेवी संस्थांनी देखील मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांनी उत्सव म्हणून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले असल्याचे सर्वांनी पाहिले. यामुळे यंदा विधानसभेसाठी मतदानाचा टक्का वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

99.37 टक्के मतदारांना चिठ्ठ्यांचे वाटप
लोकशाहीचा उत्सव असणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचा भाग असणार्‍या टपाली मतदानाची प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यात आली. यात जिल्ह्यात बारा मतदारसंघातील 17,169 मतदारांनी टपाली मतदानाचा लाभ घेतला आहे. यात 2 हजार 173 ज्येष्ठ नागरिकांसह 340 दिव्यांग मतदार, निवडणूक कर्तव्य बजावणारे अधिकारी कर्मचारी अशा 14,278 तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी 56 आणि 322 सैनिक मतदार यांनी टपली मतदानाचा लाभ घेतला. त्याच सोबत शासकीय यंत्रणे मार्फत जिल्ह्यात 37 लाख 60 हजार 136 मतदारांना मतदान चिठ्ठ्याचे वाटप करण्यात आलेले आहे. वाटपाची टक्केवारी ही एकूण मतदारांच्या 99.37 टक्के आहे. जिल्ह्यात 37 लाख 83 हजार मतदार असून यातील कायमस्वरूपी स्थलांतरीत 3 हजार 139 मतदार असून 20 हजार 595 मतदार मयत आहेत.

12 मतदारसंघात पावणे चार हजार मतदान केंद्र
निवडणूक रिंगणात प्रत्येकी 16 उमेदवार असल्याने केवळ नोटा (यापैकी कोणीही नाही) या मतदान पर्यायासाठी स्वतंत्र मतदान यंत्र श्रीगोंदे व श्रीरामपूर मतदारसंघात असणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्र एकही नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत 85 ते 90 टक्के व त्यापेक्षा जास्त मतदान झालेली दोन केंद्रे शिर्डी व संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी एक आहे. जिल्ह्यात 3 हजार 763 मतदान केंद्र आहेत. मात्र 1 हजार 500 पेक्षा जास्त मतदार संख्या असल्याने नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर (राहुरी मतदारसंघ) व राहाता तालुक्यातील लोणी (शिर्डी मतदारसंघ) येथे प्रत्येकी एक वाढीव मतदान केंद्र असणार आहेत. जिल्ह्यात 12 मतदारसंघासाठी 3 हजार 765 मतदान केंद्र राहणार असून यातील 2 हजार 85 मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास सर्व मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेची करडी नजर राहणार आहे.

मतदान करतानाचा फोटो काढल्यास कारवाई
मतदान करताना अनेकजण फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात. परंतु जिल्हा निवडणूक शाखेने अशा फोटो काढणार्‍यांचा बंदोबस्त करणार असून मतदान केंद्रांच्या 200 मीटर परिसरात मोबाईल बाळगण्यास मनाई असल्याने कोणीही मतदान केंद्रामध्ये मोबाईल बाळगू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक कामकाजाकरिता नेमणुकीस असलेले मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी व मतदार यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेशाकरिता प्रतिबंध करण्यात आला आहे. या परिसरात खासगी वाहन आणण्यास किंवा संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहणार आहे.

मतदान केंद्रावर विविध सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी, विद्युत सुविधा, स्वच्छता गृह, मदत केंद्र आणि माहिती फलक अशा किमान सुविधा असतील. दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिर्डी मतदारसंघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय लोणी बु. आणि राहुरी मतदारसंघात गजराज नगर जि.प. शाळा येथे प्रत्येकी एक सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापीत करण्यात येणार आहे.

149 पर्दानशीन, तर 36 आदर्श मतदान केंद्र
जिल्ह्यात एकूण 149 पर्दानशीन मतदान केंद्र, 36 आदर्श मतदान केंद्र, प्रत्येकी 12 महिला, युवा आणि दिव्यांग संचलित मतदान केंद्र असतील. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या