Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्र20 ऑगस्टला विधानसभेसाठीची अंतिम मतदार यादी

20 ऑगस्टला विधानसभेसाठीची अंतिम मतदार यादी

राज्यात ऑक्टोबरमध्ये निवडणूकांचा बिगूल?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोकसभा निवडणुकीतील विजय- पराभव, आरोप- प्रत्यारोपांचा धुरळा ताजा असतानाच महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीरसाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानूसार मतदारयाद्या तयार करण्यासाठी 1 जुलै 2024 ही अर्हता दिनांक असणार असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 ऑगस्टला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पत्र जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाले असून आलेल्या पत्रानूसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

या पत्रानुसार ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात राज्यात मतदान लोकसभा निवडणूक उत्तम पद्धतीने पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुका घेण्यास निवडणूक आयोग सज्ज झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची मुदत 26 नोव्हेंबर 2024 संपत आहे. त्याआधी राज्यात नवे सरकार स्थापन व्हायला हवे. त्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे. शुक्रवार 20 जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र काढत महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू- काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांना मतदार यादी कार्यक्रमाचे वेळापत्रक पाठवले असून त्यानूसार कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला. त्यानंतर लगेच राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून मुदत संपणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीत कोणत्या विधानसभा मतदारसंघात कुणाला मताधिक्य मिळाले, कोण कुठे कमी पडले, कुणाला धोक्याचा इशारा मिळाला, याबाबत खल सुरू आहे.

त्यात विधानसभेसाठी इच्छुक व विद्यमान आमदारांनी केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी काढून त्यानुसार जोडण्या सुरू केल्या आहेत. गत पंचवार्षिकला विधानसभा निवडणूक 21 ऑक्टोबरला होवून त्यानंतर 24 ऑक्टोबरला 2019 मतमोजणी झाली होती. त्याचदरम्यान यावेळेचीही निवडणूक गृहीत धरल्यास सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू शकेल. त्यामुळे आचारसंहिता लागू व्हायला, अवघा दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. सध्या राज्यात आमदारांतून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्याचा निकाल लागताच विधानसभेच्या हालचालींना वेग येणार आहे. त्याचबरोबरीने निवडणूक आयोगाची प्रक्रियाही गतिमान होणार आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रमाचे पत्र जिल्हा निवडणूक शाखेला प्राप्त झालेले आहे. आलेल्या पत्रातील वेळापत्रानूसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी ‘सार्वमत’ शी बोलतांना दिली.

विधानसभा सभागृहाची मुदत
महाराष्ट्र : 26 नोव्हेंबर 2024
हरयाणा : 03 नोव्हेंबर 2024
झारखंड : 05 जानेवारी 2025

मतदार याद्यांचा कार्यक्रम असा
– केंद्रस्तरीय अधिकार्‍यांमार्फत (ब्लॉक लेव्हल ऑफिसर) मतदान नोंदणीसाठी घरोघरी सर्वेक्षण : 25 जून ते 24 जुलै 2024
– प्राथमिक मतदार यादी प्रसिद्धी : 25 जुलै 2024
– मतदार यादीवरील हरकती : 25 जुलै ते 9 ऑगस्ट 2024
– हरकतींचे निराकरण करण्यासाठी विशेष मोहीम : शनिवार, रविवार
– हरकतींवरील निकाल : 19 ऑगस्ट 2024
– अंतिम मतदारयादी प्रसिद्ध : 20 ऑगस्ट 2024

- Advertisment -

ताज्या बातम्या