अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषदेच्या आवारातील जुन्या इमारतीत असणार्या माध्यमिक शिक्षकांच्या पगाराचे काम पाहणार्या पे युनिट विभागातील सहायक लेखा अधिकारी अशोक शिंदे यांना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. मंगळवारी रात्री उशिरा यासंदर्भातील कारवाई करण्यात आली. शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी दिली.
माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकाचे निवृत्तीनंतरचे वेतन काढून देण्यासाठी शिंदे यांनी त्यांच्याकडे 10 हजार रूपयाची मागणी केली होती. त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी अशोक शिंदे याला तक्रारदार शिक्षकाकडून 10 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भातील पुढील प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. शिंदे याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक त्रिपुटे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक देवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.