लोणी |वार्ताहर| Loni
भारताच्या राजकारणात सुसंस्कृत विचारांची, राष्ट्रनिष्ठेची परंपरा सुरु करुन, देशाच्या प्रगतीचा पाया मजबुत करणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान श्रध्देय अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख संपूर्ण जगाला होती. त्यांच्या कार्यकाळातच नदीजोड प्रकल्पाच्या संकल्पनेला स्विकारले गेले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात या संकल्पनेला मुर्त स्वरुप येत असल्याचे समाधान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त ना. विखे पाटील यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे शताब्दी वर्षही सुरु झाल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहीतीही त्यांनी दिली. परराष्ट्र मंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांनी ठरविलेल्या धोरणावरच देशाची यशस्वी वाटचाल सुरु आहे. पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात प्रथमच पोखरण येथे अणूचाचणी यशस्वी करुन, भारत बलशाली असल्याचे जगाला दाखवून दिले होते.
कारगील युध्दात भारताने मिळविलेला विजय ही त्याचीच नांदी ठरली, असे सांगून ना. विखे पाटील म्हणाले, त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळातच नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली गेली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून या संकल्पनेला मुर्त स्वरुप मिळाले आहे. राज्यातही नदीजोड प्रकल्पाच्या योजनेची झालेली सुरुवात ही अटल बिहारी यांच्या दुरदृष्टीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी संत तुकाराम महाराजांचे नाणे केंद्र सरकारने प्रकाशित करावे म्हणून केलेली विनंती पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी मान्य करुन नवी दिल्ली मध्येच या नाण्याच्या विमोचन समारंभास दाखविलेली उपस्थिती हा राज्यातील वारकरी सांप्रदायाचा गौरव ठरल्याची आठवण ना. विखे पाटील यांनी निमित्ताने सांगितली.




