Tuesday, December 10, 2024
Homeनगरकोट्यवधी रुपये अडकल्याने भिशी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

कोट्यवधी रुपये अडकल्याने भिशी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

संगमनेर (शहर प्रतिनिधी) –

शहर व परिसरात सुरु असलेल्या बेकायदेशीर भिशी व्यवसायामुळे अनेकजण अडचणीत आले आहेत. भिशीमध्ये अडकलेले कोट्यवधी रुपये

- Advertisement -

वसूल होत नसल्याने त्रस्त झालेल्या शहरातील सय्यदबाबा चौकातील एका भिशीचालकाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे सय्यदबाबा चौकात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संगमनेर शहरात कोट्यवधी रुपयांच्या भिशी सुुरू आहेत. या व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा होत असल्याने शहरात हा व्यवसाय चांगलाच फोपावला आहे. या व्यवसायात अनेक गैरप्रकारही होत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. याबाबत दैनिक सार्वमतने वेळोवेळी आवाज उठवून भिशी व्यवसायामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो असा धोका वर्तविला होता.

भिशी व्यवसायात अनेक प्रतिष्ठीत अडकलेले आहेत. त्यांनी या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले आहे. मात्र हे पैसे वसूल होत नसल्याचे चित्र आहे. सय्यद बाबा चौकातील एका जुन्या भिशी चालकाचेही मोठ्या प्रमाणात पैसे या व्यवसायात अडकले आहे. या भिशी चालकाची जवळपास 4 कोटी रुपयांची भिशी चालते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भिशीत सहभागी असणार्‍या 14 सदस्यांनी पैसे थकवले आहे. 50 लाखांपासून कोटी रुपयांपर्यंत ही रक्कम थकलेली आहे. ही रक्कम मिळावी यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. मात्र रक्कम वसूल होत नव्हती. पैसे मागायला गेल्यानंतर काही सदस्यांनी त्याला दमबाजी केली. या भिशीचालकाला अन्य ठिकाणी मोठी रक्कम द्यावयाची आहे. मात्र भिशीत अडकलेले पैसे वसूल होत नसल्याने तो त्रस्त झाला होता.

पैसे वसूल होत नसल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याने विषारी औषध सेवन केले. त्याला त्वरीत खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्याचा धोका टळलेला आहे. याबाबत पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधला असता आपल्याला याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. तक्रार अर्ज आल्यास कारवाई करु असे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, शहरात सुरु असलेल्या बेकायदेशीर भिशी व्यवसायाकडे पोलीस व संबंधीत खात्याचे पूर्ण दुर्लक्ष आहे. यामुळे या व्यवसायात अनेक गैरप्रकार सुरु आहे. काही भिशी चालकांनी नागरीकांचे लाखो रुपये घेऊन पलायन केले आहे. तर काही भिशी चालकांना वाटप केलेले पैसेच वसूल होत नाही. यातून यापूर्वी शहरात हाणामार्‍याचेही प्रकार घडले होते. पोलीस प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष न दिल्यास शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते असे बोलले जात आहे.

ते 14 जण कोण?

सय्यदबाबा चौकातील या भिशी चालकाने विषारी औषध सेवन करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीमध्ये 14 जणाचा उल्लेख आहे. ये सब मेरे मौत के कारण है! असा उल्लेख करुन या 14 लोकांनी आपले पैसे न दिल्याने मी जीवनयात्रा संपवित आहे. माझ्या आत्महत्येस त्यांनाच जबाबदार धरावे असे या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे हे 14 जण कोण? त्यांनी किती पैसे बुडविले याबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या