मुंबई | Mumbai
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. माझ्या नावाने भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतल्याचे बोलले जात असल्याचा खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. याचा पुरावा म्हणून ऑडीओ क्लिप असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले. आता या कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये तीनचार व्यक्तींचं संभाषण आहे. क्लिप व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. त्यावर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. भाजपने ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळावी अशी मागणी केली आहे. तर शिंदे सेनेने या क्लिपमध्ये बोलणारे लोक भाजपचे असल्याचे म्हंटले आहे.
शिंदे सेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “ही ऑडिओ क्लिप दोन-अडीच वर्षांपूर्वीची आहे. ती आताच कशी बाहेर आली. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. तेव्हा ही क्लिप बाहेर का नाही आली. अर्थात क्लिपमध्ये हे जे तीन-चार लोक बोलत आहेत, ते भाजपाचेच आहेत. त्यात दुमत नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे.”
“क्लिपमधील लोक कॉन्फरन्सवर बोलत आहेत. त्यांच्या बोलण्यात छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई यांचे कनेक्शन आहे. कॉन्फरन्स कॉलमध्ये कुणीही हजार-पाचशे कोटी दिले बोलू शकतो. त्याला शेंडा ना बुडखा नाही”, असाही आरोप कदम यांनी केला.
मराठा समाजाला न्याय देण्याबाबत एकनाथ शिंदे साहेबांचे योगदान
पुढे रामदास कदम म्हणाले, एकनाथ शिंदे साहेब, आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत. मराठा समाजाला न्याय देण्याबाबत एकनाथ शिंदे साहेबांचं देखील योगदान आहे. त्यांचं योगदान आहे. जरांगे पाटील साहेब, एक गोष्ट तुम्हाला मी आणखी एक सांगतोय. विनोद पाटलांना विचारून घ्या. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी कायदेशीर अभ्यास हा कोणाच्या बंगल्यावर झाला, त्यांना विचारून घ्या विनोद पाटलांना, ते सांगतील. आम्ही पडद्याच्या आड आहोत आणि म्हणून एक गोष्ट मला याच्यात स्पष्ट केली पाहिजे की, दोन-दोन वर्षे, अडीच वर्षे झाली या क्लिपला. ही क्लिप आत्ता कशी बाहेर पडली? त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. मग तेव्हा ही क्लिप बाहेर का नाही आली? अर्थात, हे जे तीन-चार लोक जे बोलतायत, ते भाजपचेच आहेत. त्याबद्दल काही दुमत नाहीये. मी स्पष्टपणानं सांगतोय मीदेखील. कारण मी ऐकलेली आहे असंही पुढे कदम म्हणालेत.
एकनाथ शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न
या क्लिपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही कदम यांनी केली. त्या क्लिपमध्ये एक महिला श्रीकांत शिंदेंकडून पैसे पोहोचवले असे म्हणते. ती महिला कोण आहे? ते समोर आले पाहिजे. पैसे कुणी दिले, त्या महिलेकडे ५०० कोटी कुठून आले, हे समोर आले पाहिजे. एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी एखादा पक्ष अशा क्लिप तयार करत असेल तर सर्व समाजाने एकत्र येऊन हाणून पाडले पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली.
जरांगे एकनाथ शिंदेंच्या बाजूने उभे राहायला हवे होते
आपल्या एका समाजाच्या नेत्यावरती अशा पद्धतीनं काही मंडळींचा आरोप करून त्यांना बदनाम करत असतील, तर जरांगेजी, आपण एकनाथ शिंदेच्या बाजूने उभे राहायला हवं होतं असं माझं ठाम मत आहे. दुसरी गोष्ट आणखी एक क्लिप बाहेर येणार आहे आपली. आपल्या गोपनीय मीटिंगमध्ये भाजपचे आमदार बसलेले आहेत. मी त्यांचं नाव घेत नाही आता आणि त्या मीटिंगमध्ये आपण असं बोललात की, या मीटिंगमध्ये निम्मे पेक्षा जास्त एकनाथ शिंदे यांचे चमचे बसलेत, असं आपण बोललात. माझ्याकडे आहे ते. मी कधीही हवेमध्ये बोललो नाही. हवेवरती तलवार चालवली नाही. मी जबाबदारीने बोललोय. त्याच्यामध्ये इंगळे आहेत. इंगळेनी ज्या मीटिंगमध्ये आपल्याला सांगितलं, आपल्याला बोलले ते, हे ठीक नाही आहे म्हणून, आपण तपासून घ्या, असंही कदम पुढे म्हणालेत.
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
मिटिंगमध्ये आपण एकनाथ शिंदेचे चमचे बसलेत म्हणून बोललात
भाजपच्या आमदारांना सोबत घेऊन, एकनाथ शिंदेचे चमचे म्हणून तुम्ही काय लोकांना म्हणत असाल. तर मग नेमकी एकनाथ शिंदे यांच्याबाबत तुमची भूमिका काय आहे, हे स्पष्ट झालं. आमचा मराठा समाजाचा नेताच आमच्या मराठा समाजाच्या नेत्याला संपवतोय, असं म्हणायचं का मग? माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, नको, छत्रपती शिवाजी महाराज असताना मराठा एकत्र लढले होते. छत्रपतींनी मराठ्यांना घेऊन अनेक लढाया-लढाया लागल्या. पण सुदैवानं आज तुमच्या पाठीशी मोठा समाज उभा होता. पाटील साहेब. आपण समाजामध्ये फुट पडेल. असं आपल्याला होता कामा नये. मला वाईट वाटलं की, भाजपचा एक आमदार बसतो आपल्या गोपनीय मिटिंगमध्ये, गुप्त मिटिंगमध्ये. आता मिटिंगमध्ये आपण एकनाथ शिंदेचे चमचे बसलेत म्हणून बोललात. मला खूप दुःख झालं. खूप वाईट वाटलं.
ती महिला कोण ते समोर आले पाहिजे
माझी आपल्याला विनंती आहे, आज आपण एकनाथजी बोललात, देवेंद्रजी बोललात, मला खूप समाधान वाटलं. मला बरं वाटलं. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. तेव्हा या क्लिपची म्हणजे ३ वर्षे आधीची असुदे. पण माझी लेखी मागणी असेल आजच्या आज, त्या क्लिपची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. ही जी महिला म्हटली, डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या मार्फत आम्ही पैसे पोहोचवलोय म्हणून मग ती महिला कोण आहे ? ते समोर आलं पाहिजे. पैसे कुठं दिले? ते समोर आलं पाहिजे. त्या महिलेकडे पैसे कुठून आले द्यायला? ते तपासलं पाहिजे आणि जर का असा कुठला पक्ष एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी अशा क्लिप तयार करून जर का बाहेर पाठवून एकनाथ शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते देखील आपण सगळ्या समाज एकत्र येऊन आपण हाणून पाडलं पाहिजे.
मी आजच शिंदेंना पण भेटेन. मी पण मुख्यमंत्री आणि निवेदन देईन. मी अमित शाह साहेबांना निवेदन देईन. अगदी सखोल चौकशी याची, आपण या क्लिपची चौकशीकरून घेऊ. आणि लवकर दूध का दूध, पाणी का पाणी होईल, अशी माझी अपेक्षा आहे, असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.




