Friday, May 31, 2024
Homeनाशिकरिक्षाचालकाने घरात घुसुन लावली आग, पंचवटीतील घटना

रिक्षाचालकाने घरात घुसुन लावली आग, पंचवटीतील घटना

पंचवटी | Panchavti

पंचवटी परिसरातील (Panchavti Area) शिंदे नगर येथिल भाविक बिलाजियो सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात घुसून एका रिक्षा (Rikshaw) चालकाने थेट पेट्रोल ओतून आग लावून दिल्याची घटना घडली.

- Advertisement -

या घटनेत दोन महिला गंभीर भाजल्या तर घरातील एक वयोवृद्ध आणि दोन लहान मुले बचावली असून घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहे . याबाबत पंचवटी पोलीस (Panchavti Police) पुढील तपास करीत आहे .

याबाबत पोलिसांनी आणि पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी कि, शिंदे नगर परिसरातील भाविक बिलाजियो या इमारतीमध्ये प्रदीप ओमप्रकाश गौड (३९) हे आपले आई, वडील, पत्नी भाऊ, भावजयी, मुले आणि पुतण्यासह एकूण दहा लोक एका फ्लॅटमध्ये राहतात. मंगळवार (दि. १०) रोजी सकाळी त्यांच्या घरी त्यांची मावशी भारती गौड या आल्या होत्या. त्यांनतर बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या परिचयातील रिक्षाचालक कुमावत हा आपल्या हातात दोन पेट्रोलच्या बाटल्या घेऊन घरी आला. त्याने घरात असलेल्या भारती गौड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि सोबत आणलेल्या बाटल्यांमधील पेट्रोल घरात फेकत आग लावून देत फरार झाला.

यावेळी घरात प्रदीप गौड यांची आई सुशीला गौड (६५), आजोबा जानकीदास गौड (८५), पार्थ गौड (१५), चिराग गौड (३), मावशी भारती गौड (५५) हे होते. घरात झालेल्या भांडणाचा आवाज आणि घराला लागलेली आग पाहून पार्थ याने बेडरूमचा दरवाजा लावून घेत आपल्या वडिलांना आणि आईला फोन लावून घटनेची माहिती दिली.

या आगीच्या घटनेमध्ये सुशीला गौड आणि भारती गौड या दोन्ही बहिणी गंभीररीत्या भाजल्या आहे . घराला लागलेली आग बघून आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला (Fire Brigade) आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली. तसेच आजूबाजूच्या घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळविले .

हि आग इतकी भयानक होती कि, घरातील सिलींग फॅन जळून वाकून गेला होता. भिंतीचे आणि छताचे प्लास्टर गरम झाल्याने निखळून पडले होते. गॅलरीला लावण्यात आलेल्या काचा गरमीने फुटून गेल्या होत्या,तर टीव्ही पूर्णपणे वितळून गेल्याने भिंतीवर लोखंडी साचा उरलेला दिसत होता. घरातील सोफा आणि कपाट आणि मुलांचे पुस्तके संपूर्णपणे जळून खाक झाले होते. सुदैवाने या घटनेत वयोवृद्ध आजोबा आणि अवघ्या तीन वर्षांचा चिराग पार्थच्या प्रसंगावधानाने वाचला.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक साखरे, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून घटनेचे नेमके कारण काय याचा पोलीस शोध घेत आहे. तसेच घटनेतील संशयित कुमावत हा देखील भाजला असल्याची माहिती त्याला पळून जाताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या