मुंबई । Mumbai
मराठी गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या आपल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) कार्यक्रमामुळे नेहमी चर्चेत असतो. या कार्यक्रमात अवधूत गुप्ते राजकारण्यांना सडेतोड प्रश्न विचारत त्यांना नेमकं काय खुपतं याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आपल्या प्रश्नांना समोर खुर्चीवर असणाऱ्या व्यक्तीवर प्रश्नांचा भडीमार करणारा अवधूत गुप्ते स्वत: मात्र एका वेगळ्या कारणाने त्रस्त आहे.
अवधूत गुप्तेच्या घरात माकडांनी उच्छाद मांडला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपली व्यथा मांडली आहे. अवधूत गुप्तेने घरात माकड शिरुन केळी उचलून नेत असल्याचा व्हिडीओही शेअर केला आहे. वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज यासाठी कारणीभूत असल्याचं सांगत त्याने विनंतीही केली आहे.
अवधूत गुप्तेने सांगितलं नक्की काय झालं
अहो गुप्ते .. तुम्हाला काय खुपते? तर सध्या आम्हाला दररोज सकाळी उठून बघायला मिळणारी एक ‘माकड चेष्टा’ खुपते. व्हिडिओमध्ये दिसणारी ही माझी आई. हीचंच आम्ही दोन वर्षांपूर्वी लंग ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन केलंय. तर, तिच्या नाकावर टिच्चून घरात येऊन केळी पळवणारा (पळवणारा कुठला.. तिथेच बसून खाणारा) आणि तिच्याच अंगावर धावून जाणारा हा हुप्प्या बघा! हा त्रास आमच्या बोरिवलीतल्या श्रीकृष्ण नगरमधल्या प्रत्येक रहिवाशाला आता असह्य झाला आहे! अनेकांनी वनखात्याकडे तक्रारदेखील केली आहे. वनखातेदेखील काही उपाय योजनांचा विचार नक्कीच करत असेल, याची मला खात्री आहे. ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ हे बाजूलाच असल्यामुळे, विविध पक्षी- प्राण्यांच्या भेटी हे खरंतर आमच्या श्रीकृष्णनगरचे आभूषण. आम्ही हे वर्षानुवर्षांपासून मिरवतदेखील आलो आहोत. पण, माकडांचा त्रास हा करोना पश्चात कित्येकपटींनी वाढला आहे, हे मात्र खरं! आणि याचं खरं कारण म्हणजे त्याआधी वर्षानुवर्षे उद्यानात फिरायला गेलेल्या आपण सगळ्यांनी याच माकडांना खायला दिलेली केळी, वडापाव, पॉपकॉर्न आणि लेज!
ही माकडं पिढ्यानपिढ्यापासून आता शंभर टक्के वन्य जीवनाला मुकली आहेत. झाडावर राहतात, तरी टाकीवरच्या पत्र्याखाली झोपतात. आमच्याच झाडावरच्या तुत्या, जाम, आंबे, पेरू वगैरे फळे काढून खातातसुद्धा. पण, ते केवळ हौसे खातर! बाकी.. सकाळी घरांच्या खिडक्यातून चपात्या लाटण्याचे आवाज आणि फोडण्यांचा वास सुटला, की खिडकीच्या जाळ्यांवर येऊन ओरडा आरडा करून हक्काने हे सर्व पदार्थ मागतात. माकडं यायची. करोनाआधीसुद्धा यायची. पण, महिन्या- दोन महिन्यातून चुकून भरकटत आलेली अशी. करोना काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांना जायची परवानगी बंद झाली आणि त्याबरोबरच बंद झाला या माकडांचा खुराक. मग या वेळेस तो खुराक शोधत ती इथे आली आणि मग इथलीच झाली. आता ती इथेच राहतात आणि छळतात! फक्त यापुढे तुम्ही कुठेही फिरायला गेलात आणि माकड दिसल्यावर त्यांना काही बाही खाऊ द्यायला तुमचा हात किंवा मुलं पुढे सरसावलीच.. तर हा व्हिडिओ नक्की आठवा! एवढेच काय ते.. शुभ दिवस!