वणी | वार्ताहार
शहरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, सलग दोन दिवसात आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर परिसरात मध्यरात्री १२.५५ च्या सुमारास भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीची तीव्रता एवढी होती की, शेजारील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरालाही आगीने विळख्यात घेतले. घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य आगीत खाक झाले. सुदैवाने वेळीच कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलविल्याने मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक तरुणांनी सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे पाचच्या सुमारास आग आटोक्यात आणली.
प्राथमिक माहितीनुसार, रात्री १२.५५ च्या सुमारास गोदामाजवळील एका व्यक्तीला आतून धूर येत असल्याचे दिसले. त्याने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना जागे केले. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गोदामाला लागून असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे दुर्गेश गांगुर्डे यांच्या कुटुंबीयांना प्रसंगावधान राखून तातडीने घराबाहेर काढले. भंगार गोदामाच्या शेजारील पत्र्याच्या छतावर बसविलेले टर्बो पंखे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यानंतर आगीचे लोळ शेजारील घरात शिरल्याने घरातील फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अन्य संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गोदामामागील अनिल गांगुर्डे यांच्या घरालाही आगीच्या झळा पोहोचल्या. त्यांनी वेळीच त्या बाजूचे साहित्य हलविल्याने पुढील नुकसान टळले.
गोकुळच्या सत्तासंघर्षामागचं ‘गुपित’ फडणवीसांनी उघड केलं!म्हणाले, मी आधीही सांगितले होते…
नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या टँकरच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न केले मात्र गोदामामधील ज्वलनशील साहित्य आणि आगीची तीव्रता पाहता हे प्रयत्न अपुरे ठरले. त्यामुळे दिंडोरी नगरपंचायतीच्या अग्रिशमन दलाला पाचारण केले. अग्रिशमन दलाच्या जवानांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने पाण्याचा मारा सुरू ठेवला. गोदामामधील प्लास्टिक, पुढे, रद्दी आणि बाटल्यांनी पेट घेतल्याने आग अधिकच भडकली होती. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. बचावकार्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील तरुणांसह शहराच्या विविध भागांतील युवकांनी सक्रिय सहभाग घेतला. माजी उपसरपंच किरण गांगुर्डे, राकेश थोरात सुदर्शन बिरार यांनी पहाटेपर्यंत घटनास्थळी थांबून आग विझविण्याच्या कामात सहकार्य केले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा रात्रीपासून खंडित केला होता.
दुसऱ्या घटनेत, कसबे वणी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारामागील कचऱ्यालाही आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे शहरात सलग दुसऱ्या दिवशी आगीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असल्याने आगीच्या घटनांमागे फटाक्यांच्या ठिणग्या कारणीभूत ठरत आहेत का, याबाबतही चर्चा सुरू आहे. आंबेडकरनगरमधील भंगार गोदामाला फटाक्याच्या ठिणगीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शहराची वाढती लोकसंख्या, दाट लोकवस्ती आणि वाढते व्यावसायिक क्षेत्र लक्षात घेता कसबे वणीसाठी स्वतंत्र अग्रिशमन वाहन, आवश्यक उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.




