मुंबई | Mumbai
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. एकीकडे दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणुक सुरु असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन नियुक्त संचालकांच्या निर्णयावरून महत्त्वाचा खुलासा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये या संपूर्ण वादावर आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भाष्य केले आहे. “हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र बसून निर्णय घेतला असता, तर शासन नियुक्त संचालक पाठवण्याची वेळच आली नसती,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्षाला पुन्हा एकदा राजकीय वळण मिळाले आहे.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक संवादादरम्यान बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “गोकुळसंदर्भात मी आधीही सांगितले होते की, तिथे एक प्रकारे वैधानिक पेच निर्माण झाला होता. एका गटाकडे १३ तर दुसऱ्या गटाकडे १२ जागा होत्या. यामुळे कोरम (गणपूर्ती) पूर्ण होत नव्हता आणि कोणाच्याही एकाच्या भरोश्यावर अध्यक्ष होऊ शकत नव्हता. सरकारला जर आधीच वाटले असते, तर निवडणुकीनंतर लगेचच संचालक टाकले असते. डीडीआर सुद्धा असतो, मात्र कोरमसाठी बहुमत नाही हे लक्षात आल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या भूमिकेचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “कालच उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, या अध्यादेशात कोणताही डिफेक्ट नाही. तसेच, चार जणांची मते वेगळी ठेवा आणि निवडणूक पूर्ण करा, असेही न्यायालयाने सांगितले आहे.”
आम्ही खुलेपणाने सांगितले होतं, सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र येत निर्णय केला असता तर शासननियुक्त संचालक पाठवले नसते. मात्र, गोकुळच्या निवडणुकीला राजकीय रंग दिला गेला, राहुल गांधी देखील त्यात उतरले, असे म्हणत फडणवीसांनी गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राहुल गांधींनाही लक्ष्य केलं.
आम्ही सहकाराच्या क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना गोकुळमध्ये नेमले आहे. एक गायनॅकॉलॉजिस्ट असेल तर त्यात चूक काय. आता देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जर लक्ष घालावे लागत आहे, तर गायनॅकोलॉजिस्ट तर साधा माणूस आहे, असे म्हणत संचालक निवडीवरुन होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधींचे आंदोलन म्हणजे सगळ्या संस्थांबद्दल अविश्वास तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कोणत्याच संस्था तुम्हाला न्याय देऊ शकणार नाही असा अविश्वास तयार करायचा, आपल्या संविधानावर अविश्वास तयार करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न असल्याचेही फडणवीसांनी म्हटलं.




