हॉकी ज्युनियर आशिया चषकावर भारतीय महिला खेळाडूंनी देशाचे नाव कोरले आहे. खेळाडूंच्या भीमपराक्रमाने देशाला प्रथमच हा मान मिळाला आहे. अंतिम फेरीत अनुभवी दक्षिण कोरियाच्या संघाचे आव्हान होते. दक्षिण कोरियाने हा चषक चार वेळा जिंकला आहे. त्या तुलनेत भारतीय संघात ८ खेळाडू तुलनेने अननुभवी होत्या. ज्या पहिल्यांदाच आशिया चषक सामने खेळल्या. संघात फलटण जिल्ह्यातील आसू गावची वैष्णवी फाळके आणि वाखारी गावच्या अक्षता ढेकळेचा समावेश आहे. आव्हानाला भिडणे संघातील खेळाडूंसाठी नवीन नव्हते. वैष्णवी आणि अश्विनी शेतकऱ्यांच्या मुली. ज्यांनी कुटुंबियांना कायमच विपरीत हवामानाशी लढताना पाहिले असावे. संघातील दीपिका आणि रोपनी या झारखंडच्या खेळाडूंनी पित्याचे छायाछ्त्र गमावले आहे. दोघींच्याही माता मजुरी करतात. मुमताज खानची आई भाजी विकते. महिमाच्या घरची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तिने स्वतः शेतात मजुरी केली आहे. या विजयानंतर संघातील खेळाडूंच्या आणि त्यांच्या पालकांच्या ‘बादल पे पाँव है…या झुटा गांव है.. अभ तो भई चल पडी अपनी ये नाव है..’ अशाच भावना असणार. त्याच देशातील सर्वांच्या असणार. त्यांचा पराक्रम इथपर्यंतच मर्यादित नाही. मैदानावर खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक मुलींच्या मनात उमेद जागी झाली असणार. आपल्यासारख्याच मुली परिस्थितीशी झगडून खेळात इतिहास रचू शकतात तर आपण का नाही, असेच मुलींना वाटत असणार. त्यांच्या पालकांना खेळाचे महत्व पटवून देणे कदाचित सहज वाटू शकेल. संघातील बहुसंख्य खेळाडूंचे पालक सामान्य परिस्थितीचे आहेत हेही त्यांच्या निदर्शनास आणता येऊ शकेल. खेळात करियर करण्याचे स्वप्न पाहणे मुलांच्या तुलनेत मुलींसाठी अजूनही फारसे सोपे नाही. प्रत्येक नियमाला अपवाद असतो असे म्हणतात. तसा यालाही आहे. तथापि बहुसंख्य मुलींना मात्र मैदानावर खेळणेही अवघड असते. पालकांच्या परवानगीचा अडथळा पार करणे सहज शक्य नसते. परकर पोलक्यात गल्लीत हुन्दडणारी मुलगी थोडीशी मोठी झाली कि तिच्या मनमोकळ्या खेळण्यावर मर्यादा आणल्या जातात हा आजच्या काळातही सार्वत्रिक अनुभव असावा. यातूनही तावूनसुलाखून ज्या मुली नेटाने पुढे खेळतात त्यांच्यासाठी अडथळ्यांची शर्यत पालकांच्या परवानगीपुरती मर्यादित नसते. संधी मिळताच मुलींनी तिचे लगेच सोने करावे अशीच अनेक पालकांची अपेक्षा असते. मैदान गाजवले तर खेळणे सुरु राहू शकेल अशी मुलींचीही भावना असावी. असे अनेक प्रकारचे दबाव मुलींना सहन करावे लागत असावेत. अर्थात प्रत्येक खेळाडूला संधी मिळतेच असे नाही. तथापि मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यात मोकळया हवेत खेळणे तितकेच महत्वाचे आहे. राज्य सरकारने महिलांची आरोग्य तपासणी अभियान राबवले. त्याचे माध्यमात प्रसिद्ध झालेले निष्कर्ष फारसे आशादायक नाहीत. शेकडो महिलांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार जडले आहेत. अनेकींच्या शरीरात कॅन्सरची लक्षणे आढळली. दुर्दैवाने कमी वयोगटाचाही याला अपवाद नाही. त्यामुळेही मुलींनी खेळायलाच हवे. उपरोक्त विजयासारखे पराक्रम मुलींचा मैदानापर्यंतचा मार्ग प्रशस्त करतात. हेही नसे थोडके. विपरितेचे भांडवल न करता त्यावर मात करत पराक्रम गाजवणाऱ्या सर्व खेळाडूंचे-त्यांच्या पालकांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा.