मुंबई | Mumbai
बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत पोलिसांनी जो स्वरक्षणार्थ गोळीबार केला त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. हा एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) हलगर्जीपणामुळे झाला आहे असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. दरम्यान आता पोलिसांनी सर्व घटनाक्रम समोर आणला आहे.
अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली होती. याचसंदर्भात अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते.
हे ही वाचा : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट
प्राथमिक माहिती नुसार संध्याकाळी सुमारे 05.30 वाजता अक्षय शिंदेला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला ठाणे इथे घेऊन जात असताना अंदाजे संध्याकाळी 06 ते 6.15 च्या सुमारास पोलीस वाहन मुंब्रा बायपास इथे आले. यावेळी आरोपी अक्षय शिंदेने पथकातील पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्याकडून बंदूक हिसकावून घेतली.
त्याने पोलिसांच्या दिशेने 03 गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी ही निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागली. स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने एक गोळी झाडली. ती गोळी आरोपी अक्षय शिंदेला लागून जखमी झाला. पोलीस पथकाने तात्काळ जखमी पोलीस निलेश मोरे आणि आरोपी अक्षय शिंदेला उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल केले.
हे ही वाचा : …तर ६५ आमदार राजीनामा देणार
त्यानंतर निलेश मोरे यांना पुढील उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदे याचा यावेळी मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह हा नियमानुसार मुंबईतील जेजे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला आहे. सदर माहिती ही ठाणे शहर पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे.