मुंबई | Mumbai
बदलापूरमधील शाळकरी मुलीसोबत झालेल्या प्रकरणामुळे राज्यात संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. बदलापूरजवळ झालेल्या या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार व पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. हात बांधलेले असताना व तोंडावर बुरखा असताना अक्षय शिंदे यानं पोलिसांवर हल्ला कसा केला, असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी अक्षय शिंदेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलिसांनी त्याचे हात बांधलेले आणि तोंडावर काळे फडके बांधलेले दिसत आहे. “अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होतेतेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे – फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे।”, असे कॅप्शन लिहून संजय राऊत यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
तसेच, अक्षयच्या ‘एन्काऊंटर’वर आईनं संताप व्यक्त केला आहे. माझ्या मुलाला कशासाठी मारलं? मुलानं कधी फटाकडी वाजवली नाही. त्याला गाडी चालवता येत नाही. मग, त्याला पिस्तूल कशी पकडता येणार? असा सवाल अक्षयच्या आईनं उपस्थित केला आहे. तसेच, काहीतरी करून अक्षयला मारून टाकलं, असा आरोप अक्षयच्या व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : …असा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम