जळगाव । प्रतिनिधी –
असोदा येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केले होते. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून सदरचे काम रखडले आहे. ज्या लोकप्रतिनिधींनी बहिणाबाईंच्या स्मारकाकडे इतके दुर्लक्ष केले, त्यांना असोद्यात मत मागण्याचा कोणताच अधिकार नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ असोदा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना आमदार श्री.खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. असोदा परिसरासाठी तुम्ही कोणते ठोस काम केले, ते सांगा. रस्ते आणि गटारींसारखी किरकोळ कामे सांगू नका. मंत्र्यांकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यासाठी विकासाची दृष्टी असलेल्या गुलाबराव देवकरांना यावेळी विजयी करा, असे आवाहन आमदार एकनाथ खडसे यांनी केले.
बहिणाबाईंच्या स्मारकाची वाट लावलीअसोद्यातील बहिणाबाईंच्या स्मारकाला एक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आणण्याचा माझा मानस होता. त्यादृष्टीने आम्ही त्यावेळी मुंबईच्या प्रसिद्ध वास्तू विशारदांकडून सुगरणीच्या खोप्यासारखा आकार असणारा स्मारकाचा आराखडा देखील तयार करून घेतला होता.यांची होती प्रमुख उपस्थितीउद्धव सेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील, कृऊबासचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, विद्यमान उपसभापती प्रा.पांडुरंग पाटील, संचालक दिलीप कोळी, मनोज चौधरी, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, भादलीचे सरपंच मनोज चौधरी, असोद्याचे माजी सरपंच विलास चौधरी, छावा संघटनेचे भीमराव सपकाळे, मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी नामदेव चौधरी, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, दापोर्याचे नानाभाऊ सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, किसान सेलचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलीक, सामाजिक न्यायचे दत्तू सोनवणे, आर.सी.महाजन, तुकाराम भोळे आदी व्यासपीठावर होते. असोद्याचे ग्रा.पं.सदस्य हेमंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
आंदोलनावेळी आमदार काय करीत होते – शरद कोळी
जात प्रमाणपत्रासाठी कोळी समाज बांधवांनी जळगाव शहरात तब्बल 20 दिवस आमरण उपोषण करून न्याय मागितला होता. त्यावेळी तुमचे आमदार झोपा काढत होते का, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केली.
महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीणमधील उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ भोकर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना उद्धव सेनेचे फायर ब्रॅन्ड नेते शरद कोळी यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. पालकमंत्र्यांवर देखील त्यांनी निशाणा साधला. तापी नदीवरील भोकर-खेडीभोकरी दरम्यानच्या पुलाचे काम गेल्या दोन पंचवार्षिकपासून रखडले आहे. हा पूल आम्हीच पूर्ण करू आणि त्याचे उद्घाटन देखील आम्हीच करू, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), शिंदे सेनेचे तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, किसान सेलचे रवींद्र पाटील, भोकरचे माजी सरपंच हरीश पवार आदी उपस्थित होते. लक्ष्मण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.