संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
लोकशाही प्रक्रिया ही निकोप असावी. निवडणूक आयोगाने मतदानासाठी निर्दोष कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. मात्र असे होत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगाचा कार्यक्रम हा मंत्रालयातील कुणीतरी पीए ठरवत असून त्याची अंमलबजावणी आयोग करत आहे. निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाला असल्याची कठोर टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेरमध्ये मंगळवारी (दि.2) माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, राज्यघटना आणि देश टिकवण्यासाठी लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे आणि या मतदार प्रक्रियेमध्ये निर्दोष कार्यक्रम जाहीर होत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. दोन दिवसांवर निवडणूक प्रक्रिया येते आणि त्यानंतर स्थगित केले जाते हा प्रकार कधीच घडला नाही, मात्र असं आता घडत आहे हा काय गोंधळ चालला आहे? असा सवाल करताना मंत्रालयातील कोणीतरी पीए निवडणूक कार्यक्रम तयार करतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असे आमचे स्पष्ट मत आहे. कारण निवडणूक आयोगातील अधिकारी उच्चपदस्थ असतात त्यांना निवडणुकीचा अनेकवेळा अनुभव असतो. परंतु ते सत्तेच्या दबावाखाली काम करत आहे.
मतदारयाद्यांमध्ये गोंधळ आहे. याबाबत आम्ही अनेकवेळा दाद मागितली. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे. मतदारयाद्या दोष दुरुस्त करावा अशी आमची मागणी असताना साधा तहसीलदार उत्तर देतो तो दूर होऊ शकत नाही. मतदारयादीचा गोंधळ आणि ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात हे सर्व देशाने पाहिले आहे. त्यामुळे आज मतदान झाल्यानंतर उद्याच मतमोजणी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण वीस दिवस ईव्हीएम पेट्यांचे काय होईल याबाबत सर्व देशातील जनतेला शंका आहे. कारण सत्ताधार्यांचे वागणे असे आहे की शंका येणे साहजिक असल्याचे ते म्हणाले.




