Wednesday, February 4, 2026
Homeनगरबाकी सारे सोडून शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहा - थोरात

बाकी सारे सोडून शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहा – थोरात

मराठवाड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली असून आता बाकी सारे सोडा पहिले शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन राज्य सरकारला केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ढोरकिण तसेच टाकळी फाटा (ता.पैठण) येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली. यावेळी खासदार कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, यूसुफ शेख, रवींद्र काळे, विनोद तांबे, भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, रावसाहेब नाडे, संभाजी काटे, रवींद्र आमले आदिंसह विविध पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे घर आणि सामानाची वाताहात झाली आहे. यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे. पावसाने हाहाकार उडाला आहे. मात्र शासन कुठल्याही ठोस उपाययोजना करत नाही. बिहार येथे काँग्रेसच्या बैठकीसाठी उपस्थित राहून माजी मंत्री थोरात यांनी थेट मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ते म्हणाले, अतिवृष्टीने नुसती शेती खचलेली नाही तर महाराष्ट्र खचला आहे. शेतकर्‍यांपुढे मोठे संकट आहे. अनेक ठिकाणी पूर्ण पिके पाण्याखाली गेली तर काही ठिकाणी जमीन सुद्धा वाहून गेली आहे. अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यामुळे शासनाने आता कुठलेही कागदी घोडे न नाचवता सर्व नियम व अटी टाळून तातडीने मदत केली पाहिजे.

YouTube video player

शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहणे ही सरकारची पहिली भूमिका असली पाहिजे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. अनेक जाचक अटी टाकल्या जात आहेत. आता बाकी सारे सोडा पहिले शेतकर्‍यांना मदत करा. पंचनामे करण्यास गती द्या, याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. तर सत्ताधारी येऊन फोटोसेशन करत आहे, मात्र कुठलीही ठोस मदत जाहीर करत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. या सरकारला फक्त राजकारण करायचे आहे. शेतकर्‍यांशी काही घेणे देणे नाही अशी टीका खासदार काळे यांनी केली.

ताज्या बातम्या