Friday, September 20, 2024
HomeराजकीयBalasaheb Thorat : भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला; 'त्या'...

Balasaheb Thorat : भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला; ‘त्या’ वादग्रस्त विधानांवरून थोरातांचा निशाणा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

अमेरिकेतील एका मुलाखतीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडल्यानंतर त्यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्याची मालिकाच सुरू झाली आहे.

शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी यावरून भाजपसह महायुतीवर जोरदार प्रहार केला आहे. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या अधिकृत “X” अकाऊंटवरून भाजपसह महायुतीला लक्ष्य केले. शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर टीका करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत ते म्हणाले, “भाजपा आणि महायुतीच्या वाचाळवीरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राची सुस्कृंत राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग २०१४ ला सुरु झाला तो रोज खालच्या पातळीवर जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासत आहेत आणि त्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या वाचाळवीरांना मूक पाठिंबा आहे हे अत्यंत धोकादायक आहे. संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्या एवढेच दोषी आहेत. संजय गायकवाड, अनिल बोंडेंना तर जनता शिक्षा तर देईलच पण यांच्या कर्माची फळं यांना पाठीशी घालणा-या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत,” असे ते म्हणाले.

हे देखील वाचा : दशकभरानंतर जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला सुरुवात, मतदारांमध्ये उत्साह

अनिल बोंडेंनी काय म्हटलं?

संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा केली, ती योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले, तेही भयानक आहे. त्यामुळे परदेशात जाऊन कोणी वात्रटासारखं बोलत असेल, तर जीभ छाटू नये, जीभेला चटके दिले पाहिजेत. त्यात मग राहुल गांधी, ज्ञानेश महाराव किंवा श्याम मानव असो. भारतातील बहुसंख्याकांच्या जे भावना दुखावतात. त्या लोकांना कमीत-कमी जाणीव करून दिली पाहिजेल, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

संजय गायकवाड काय म्हणाले?

महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात मागासवर्गीय, आदिवासी आणि अन्य प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिलं. मात्र, राहुल गांधींनी विदेशात जाऊन, ‘माझ्या देशातील आरक्षण संपवायचं आहे,’ असं विधान केलं. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून राहुल गांधींनी त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर ओकली, लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करून काँग्रेसनं मते घेतली. आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करू लागले आहेत. १०० टक्के काँग्रेसला मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देईल,”असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं.

हे देखील वाचा : नवाब मलिकांच्या जावयाचा भीषण अपघात; कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला अन्…

- Advertisment -

ताज्या बातम्या