Monday, May 20, 2024
Homeनगरपक्षात मला अपमानास्पद वागणूक !

पक्षात मला अपमानास्पद वागणूक !

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी आणि तांबे कुटुंबाला पक्षाबाहेर काढण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केल्यानंतर थोरात यांनी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्याशी कोणतीही चर्चा न करता पक्षात परस्पर निर्णय घेतले जात असून पक्षात मला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे, अशी तक्रार करत थोरात यांनी पटोलेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आपल्याविरोधात जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले. अशा गोष्टीमुळेच आपल्याला पटोलेंसोबत काम करणे शक्य नाही, असेही थोरात यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देत पक्षाने त्यांना कोरे एबी फॉर्म पाठवले होते. परंतु, डॉ. तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता आपला मुलगा सत्यजीत तांबे याला अपक्ष उमदेवारी अर्ज भरण्यास पाठिंबा दिला. तांबे यांच्या निर्णयामुळे काँग्रेसची नाचक्की झाली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत काँग्रेस हा कोणाच्या घरचा पक्ष नाही, अशी तंबी देत तांबे पिता-पुत्रावर कारवाई करीत त्यांना पक्षातून निलंबित केले.

विधान परिषदेच्या निवडणूकीतील विजयानंतर सत्यजित तांबे यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे पत्र पाठवून पटोलेंविरोधातील तक्रारींचा पाढा वाचला आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेस अंतर्गत वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान जे राजकारण झाले ते अतिशय व्यथित करणारे होते. हे प्रकरण मिटविण्याऐवजी ते वाढविण्यात आले. निवडणुकीवेळी माझ्याविरोधात जाणूनबुजून संशयाचे वातावरण तयार केले गेले. त्यावेळी पक्ष कुणाच्या घरचा नाही, हे कुटुंबाविरोधात सार्वजनिकरीत्या वक्तव्य करण्यात आले. वास्तविक पक्षाच्या नेत्यांनी अशी वक्तव्ये जाहीरपणे करता कामा नये, असे थोरात यांनी पत्रात म्हटले आहे. संगमनेरमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा आणि त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेथील विकास कामांमध्येही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही थोरात यांनी केला आहे.

जिल्हा कार्यकारिणी बरखास्त थोरात यांची तीव्र नाराजी

पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याबद्दल थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यापूर्वी आपल्याशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही किंवा आपले मतही विचारात घेतले नाही, याकडेही त्यांनी पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या