शहादा । Shahada
पिंप्री (ता. शहादा) येथे अज्ञात व्यक्तींनी केळीची सुमारे चारशे ते पाचशे झाडे कापून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. यात सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
प्रिंप्री (ता.शहादा) येथील उद्धव लिमजी पाटील यांनी आपल्या शेतात केळी पिकाची लागवड केली आहे. महागडे रोपे खरेदी करुन त्याला खतपाणी घालत मेहनतीने या पिकांना जगवले. श्री.पाटील शेतातील कामे आटोपल्यानंतर सायंकाळी घरी आले. दुसर्या दिवशी सकाळी ते शेतात गेल्यानंतर सुमारे चारशे ते पाचशे केळीची झाडे जमिनीवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापून फेकल्याचे निदर्शनास आले.
संबंधित शेतकर्याचा हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिरावून नेला आहे. यात सुमारे चार ते पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत शेतकर्यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यंदा प्रथमच केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्याची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. मात्र अज्ञात व्यक्तीने केळीचे झाडे कापल्याने शेतकर्याला मोठा आर्थिक भूदर्ंड सोसावा लागणार आहे.