Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशबांगलादेशमध्ये अद्याप हिंसक परिस्थीती; जमावाने सर्वोच्च न्यायालयाला घेरलं, सरन्यायाधीशांचा राजीनामा!

बांगलादेशमध्ये अद्याप हिंसक परिस्थीती; जमावाने सर्वोच्च न्यायालयाला घेरलं, सरन्यायाधीशांचा राजीनामा!

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छेडलेल्या आंदोलनामुळे शेख हसिना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतरही बांग्लादेशमधील आंदोलन थांबण्याचे नाव घेत नाहीये. आताही बांगलादेशमध्ये आंदोलन सुरुच आहे. बांग्लादेशातील नागरिकांनी आता सर्वोच्च न्यायालयाला घेरले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन केले जात आहे.

- Advertisement -

शेकडो बांगलादेशी आंदोलकांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घालत मुख्य न्यायाधीश ओबैदुल हसन यांनी दुपारी १ वाजेपर्यंत राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. आंदोलकांनी इतर न्यायाधीशांनाही त्यांची पदे सोडण्यास सांगितले आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, आंदोलकांनी मुदतीपूर्वी राजीनामा न दिल्यास न्यायाधीशांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याची देखील धमकी दिली होती. यानंतर सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.

ओबैदुल हसन हे शेख हसिना यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या वर्षीच त्यांची मुख्य न्यायाधिशपदी नियुक्ती केली गेली होती. मात्र शेख हसिना यांनाच बांगलादेशच्या नागरिकांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडले. त्यानंतर ओबैदुल हसन यांनाही आंदोलकांसमोर झुकत पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

मुख्य न्यायाधिशांनी संपूर्ण न्यायालयाची बैठक बोलावल्याची आधी बातमी आली. ज्यामुळे आंदोलक भडकले आणि शेकडो आंदोलकांनी सरन्यायाधीश आणि विभागाच्या न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला. अब्दुल मुकाद्दिम नावाच्या आंदोलकाने दावा केला की मुख्य न्यायाधीश अंतरिम सरकारला अवैध ठरवण्याचा कट रचत आहेत.

दरम्यान, हंगामी सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ महमूद यांनी फेसबुकवर पोस्ट करत सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांचा बिनशर्त राजीनामा द्यावा आणि पूर्ण न्यायालयाची बैठक थांबवावी, अशी मागणी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या