ढाका | Dhaka
बांगलादेशमध्ये ‘इन्कलाब मंच’चे युवा नेते शरीफ उस्मान हादी यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले आहे. १२ डिसेंबर रोजी शरीफ उस्मान हादी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञातांनी गोळीबार केला होता. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये परिस्थिती अत्यंत बिकट असून संतप्त जमावाने देशातील प्रमुख प्रसारमाध्यम असेलल्या कार्यालयांना लक्ष्य केले आहे. तसेच रस्त्यावर तोडफोड आणि जाळपोळ केली जात आहे. गेल्या आठवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात गोळी झाडून हादी गंभीर जखमी झाले होते.
शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हादी यांचे समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तसेच त्यांच्या समर्थकांनी काही भागात जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ‘इन्कलाब मंच’ने ढाकामधील शाहाबाग परिसरात एकत्र येण्याचे आवाहन हादी यांच्या समर्थकांना केले होते. हादी हे बांगलादेशातील विद्यार्थी नेते म्हणून उदयास आले होते.
सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची तयारी करत होते
शरीफ उस्मान हादी हे इन्कलाब मंचा संघटनेचे प्रवक्ते होते. ते सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची तयारी करत होते. शुक्रवारी ते ढाका येथे निवडणूक प्रचार सुरू करत असताना, मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यांना गंभीर अवस्थेत स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेण्यात आले. सहा दिवस व्हेंटीलेटरवर राहिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.
हादी यांच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या जमावाने देशातील प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयावर हल्ले केले. यात देशातील सर्वात मोठे वृत्तपत्र ‘डेली स्टार’ आणि ‘प्रोथोम आलो’ च्या कार्यालयांचा देखील समावेश आहे. आंदोलकांनी कार्यालयात जबरदस्तीने घुसून तोडफोड आणि जाळपोळ केली. आग लावल्यानंतर सुमारे २५ पत्रकार आत अडकले होते, ज्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
राजशाही विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मोठा निषेध मोर्चा काढल्यानंतर राजशाही शहरात तणाव निर्माण झाला. विद्यापीठ कॅम्पसपासून सुरू झालेले हे निदर्शने अखेर शहराच्या मध्यभागी गेली, तिथे आता बंदी घातलेल्या अवामी लीगच्या पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
मोहम्मद युनूस यांच्याकडून शोक व्यक्त
युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शोक व्यक्त केला आहे. शुक्रवारी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये, हादी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दरम्यान, बांगलादेशचे लष्कर तसेच पॅरामिलिटरीतील जवानांना तणावग्रस्त भागांत तैनात करण्यात आले आहे.
भारतीय उच्चायुक्तालयावर दगडफेक
दंगलखोर भारतीय कार्यालयांना लक्ष्य करत आहेत. चितगावमधील भारतीय उच्चायुक्तालयावर दगडफेक करण्यात आली आहे. निदर्शकांनी भारतविरोधी घोषणाबाजी केली आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना खुलेआम खुनाच्या धमक्या दिल्या जात आहेत.
हादी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता हादी यांचे समर्थक भारताविरोधात घोषणा देत आहेत. गुरुवारी रात्री ९:४० वाजता एका पोस्टमध्ये, इन्कलाब मंचने शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूची घोषणा केली “भारतीय वर्चस्वाविरुद्धच्या संघर्षात देवाने महान क्रांतिकारी उस्मान हादी यांना शहीद म्हणून स्वीकारले आहे.”, असे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. शरीफ उस्मान हादी हे इन्कलाब मंचचे प्रवक्ते आणि या संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




