Saturday, June 15, 2024
Homeनगरबारागाव नांदूर येथे आढळला अज्ञात तरूणाचा मृतदेह

बारागाव नांदूर येथे आढळला अज्ञात तरूणाचा मृतदेह

हात-पाय बांधलेले, अंगावर वार केल्याच्या खुणा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील बारागावनांदूर येथील देवकर वस्तीवरील डावा कालव्याच्या कडेला 2 जून रोजी सकाळच्या सुमारास एका 100 लिटरच्या प्लास्टीकच्या पिंपात सुमारे 30 वर्ष वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे बारागावनांदूरसह राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, राहुरी तालुक्यातील बारागावनांदूर येथील मुळाधरणातून येणार्‍या डाव्या कालव्यालगत काल सकाळच्या सुमारास परीसरातील एक इसम कालव्याच्या कडेने जात असताना त्याला उग्र वास आल्याने त्याने वासाच्या दिशेने शोध घेतला असता, कालव्याच्या कडेला असलेल्या झुडूपात एका शंभर लीटरच्या पिंपात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसून आला.

त्या इसमाने तात्काळ पाहिलेल्या घटनेची माहिती धनराज गाडे यांना कळविली. गाडे यांनी याबाबत त्वरीत पोलीस प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस आधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, राहुरीचे पो.नि.संजय ठेंगे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एका प्लास्टिक पिंपात अंदाजे 30 ते 35 वर्षीय तरुणाचा नायलॉन दोरीच्या सहाय्याने हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेह फुगल्याने तो पिंपात अडकला होता.

पोलीस प्रशासनाने पिंप कापून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी मृत व्यक्तीच्या अंगावर अनेक प्राणघातक वार केल्याचे दिसून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. या दररम्यान नगर येथील श्वान पथकाला व ठसे तज्ञांना घटनास्थळी पाचारण करून आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारपर्यंत आरोपींचा कोणताही सुगावा लागला नसून अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी राहुरीच्या ग्रामिण रुग्णालयात पाठविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या