बारामती | Baramati
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. या दोन्ही ठिकाणची आज मतमोजणी पार पडत आहे. दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र दोन्ही ठिकाणी निवडणूक घ्यावी लागली. त्यातच बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या दिवशी चौथ्या फेरीच्या अखेर सुनेत्रा अजित पवार यांनी 36 हजार 277 मतांची मोठी आघाडी घेत विजयाच्या दिशेने कूच केली आहे. विशेष म्हणजे, रिंगणात असलेल्या 23 उमेदवारांना मतदारांनी सपशेल नाकारल्याचे चित्र दिसत आहे.
‘नोटा’ ला अधिक मते
या निवडणुकीत चर्चेत असलेले अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा यांना मतदारांनी नाकारले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दोन्ही चर्चित उमेदवारांच्या एकत्रित मतांपेक्षा ‘नोटा’ पर्यायाला अधिक मते मिळाली आहेत.
पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह
या पोटनिवडणुकीत बारामतीकरांमध्ये काहीसा निरुत्साह पाहायला मिळाला. गेल्या निवडणुकीत ७१.८६ टक्के मतदान झाले होते, मात्र यावेळी हे प्रमाण ५८.२७ टक्क्यांपर्यंत खाली आले. एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी २ लाख २४ हजार ८७ मतदारांनी हक्क बजावला.
Rahuri Assembly Bypoll Election Result : राहुरीत सहावी फेरी पूर्ण, अक्षय कर्डिलेंना किती मते?
चौथ्या फेरी अखेर मतमोजणीची स्थिती
सुनेत्रा पवार – ३६,३७७ मते
करुणा मुंडे – ५१
अभिजित बिचुकले – ३३ मते
नोटा – ११४ मते
२३ उमेदवार रिंगणात
काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने रिंगणात 23 उमेदवार शिल्लक राहिले होते. यात बहुतांश अपक्ष उमेदवार आहेत. बारामतीचा गड पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांकडेच राहणार असल्याचे सुरुवातीच्या कलांवरून स्पष्ट झाले आहे. आता केवळ सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य किती लाखांवर जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





