मुंबई | Mumbai
आज आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्वात महत्वाचा सामना रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आज आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिमयवर रंगणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यूएईचा एकतर्फी पराभव केला आहे. तर पाकिस्तानने पहिल्या लढतीत ओमानचा पराभव केला आहे. हा सामना सुपर ४ मध्ये जाण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे.
बीसीसीआयने हा सामना रद्द करावा, अशी तीव्र आणि आक्रमक मागणी देशवासियांची आहे. मात्र या सामन्याबाबत अंतिम निर्णय झाला आहे. त्यामुळे तीव्र विरोधानंतरही हा सामना होणार असल्याचे निश्चित आहे. या सामन्याला होत असलेल्या विरोधानंतर बीसीसीआयकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. बीसीसीआय सचिव देवजित सैकीया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया काय म्हणाले?
देवजीत सैकिया म्हणाले की, मला विश्वास आहे की भारतीय खेळाडू जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरतील. भारताला अशा देशासोबत खेळावे लागते ज्याच्याशी आपले चांगले संबंध नाहीत. परंतु बहु-राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळणे हे भारत सरकारचे धोरण आहे. म्हणूनच आपण भारत आणि पाकिस्तानच्या या सामन्यांना नकार देऊ शकत नाही, असे देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले.
जो पर्यंत पाकिस्तान दहशतवादाला आळा घालत नाही तोवर…
दरम्यान सामन्यावर असलेल्या विरोधावर माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली. एसीसी (Asian Cricket Council) तसेच आयसीसी आयोजित स्पर्धेत क्रिकेट संघांना खेळणे अनिर्वाय असते. तसे न केल्यास संघाला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागते. तसेच प्रतिस्पर्धी संघाला गुण मिळतात. मात्र टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळत नाही. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला आळा घालत नाही तोवर द्विपक्षीय मालिका होणार नाही”, असे माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले.
भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये काय वातावरण?
भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचे वारे वाहत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळावं की नाही? असा संभ्रम भारतीय क्रिकेटपटूंसमोरही आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर स्टाफसोबत खेळाडूंची चर्चा झाली. व्यावसायिक राहा आणि मॅचकडे मॅच म्हणून पाहा, असा सल्ला टीम इंडियातील खेळाडूंना देण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




