Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्यामोदींना पंतप्रधान करण्यासाठी त्यागाची तयारी ठेवा : फडणवीस

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी त्यागाची तयारी ठेवा : फडणवीस

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

आपल्याला आपले नेते नरेंद्र मोदी यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यामुळे तुम्ही त्यागाची तयारी ठेवा, असे आवाहन भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना केले. तसेच येणारा काळ आपलाच आहे, पक्षासाठी झोकून काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट युती सरकारमध्ये सामील केला आहे. त्यामुळे भाजप आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे. ती दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी येथील गरवारे क्लब येथे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आमदारांना सबुरीचा सल्ला देताना अजित पवार यांना सोबत घेण्याचा निर्णय दिल्लीतून झाल्याचे सांगितले. महाविकास आघाडी कमकुवत करणे आवश्यक होते. तिसरा पक्ष सरकारात सामील करण्याचा निर्णय पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे तुम्ही संघर्षाची भूमिका न घेता, आपल्या सोबत आलेल्या इतर पक्षातील आमदारांचे स्वागत करा, असे फडणवीस म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याबरोबर सत्ता स्थापनेबाबत अनेकदा ठरवले. पण आपली फसवणूकच झाली. त्यामुळेच अजित पवार गटास सोबत घेण्याचा निर्णय झाला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सध्याच्या परस्थितीत बेरजेचे राजकारण आवश्यक आहे. महाविकास आघाडीची बेरीच अधिक होती.त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले, असा दावा फडणवीस यांनी केला. आपण कोणती पार्टी तोडत नाही. मात्र जे लोक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वेच्छेने येतील, त्यांना बरोबर घ्यावे लागणारच आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. त्यात सहकारी पक्षांना काही प्रतिनिधीत्व द्यावे लागेल. मोदी9 हे अभियान आणखी काही दिवसा चालवा. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झोकून देऊन काम करा, येणारा काळ आपलाच आहे. राष्ट्रवादी सरकारात असल्याने कोणताही संघर्ष उद्भवणार नाही, कामांची काळजी करु नका, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा जो निर्णय आहे, त्याविषयी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱी यांना समजून सांगा, अशी सूचना फडणवीस यांनी केली. बैठकीला 105 पैकी बहुतांश आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी हजर होते. माजी मंत्री पंकजा मुंडे पक्षाच्या कोअर समितीच्या सदस्या असूनही त्या बैठकीला अनुपस्थित होत्या. दरम्यान, ही बैठक मोदी9 अभियान संदर्भात होती. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांसमोर केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या