Thursday, November 21, 2024
Homeक्राईममारहाण झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मारहाण झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एलसीबीच्या पोलिसांना खबर दिल्याच्या आरोपावरून झाली होती मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एलसीबीच्या पोलिसांना तलवार विक्री करत असल्याची माहिती दिल्याच्या आरोपावरून युवकाला चाकू, लाकडी दांडके, दगड, पट्ट्याने मारहाण केल्याची घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली होती. यात जखमी असलेल्या करण अर्जुन साळुंके (वय 22 रा. जे.जे. गल्ली, कोठला) या युवकाचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.

- Advertisement -

सचिन सर्जेराव चव्हाण, संतोष भैरवनाथ पवार (दोघे रा. मंगलगेट, अहिल्यानगर), सचिन लल्लू पवार (रा. कडा ता. आष्टी जि. बीड), प्रवीण सुभाष पवार (रा. भिस्तबाग चौक, सावेडी) व रंजित एकनाथ साळुंके (रा. गजराजनगर, अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर रस्ता) यांच्यावर 4 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. 2 नोव्हेंबर रोजी रात्री करण हा कोठला परिसरातील कोंड्या मामा चौक येथे असताना त्याचा नातेवाईक सचिन सर्जेराव चव्हाण, संतोष भैरवनाथ पवार व सचिन लल्लु पवार हे दुचाकीवरून तेथे आले. अनिल सर्जेराव चव्हाण यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गजराजनगर येथे जायचे आहे, असे म्हणत त्यांनी करण याला दुचाकीवर बसवून गजराजनगर परिसरातील बांबुच्या दुकाना जवळ नेले.

तेथे गेल्यानंतर प्रवीण पवार, रंजित साळुंके हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तू एलसीबीच्या पोलिसांना मी तलवार विक्री करतो म्हणून माझी माहिती का दिली’ असे म्हणत हत्याराने वार केला. लाकडी दांडके, दगड, कंबर पट्ट्याने मारहाण करून जखमी केले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले आहे. पोलीस पसार संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या