बीड । Beed
गेल्या काही दिवसांपासून विविध घटनांमुळे चर्चेत असलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच आता गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात दोन युवकांनी मशिदीत स्फोट घडवून आणल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्धमसला गावात मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मशिदीत स्फोट घडवण्यात आला. या स्फोटासाठी जिलेटीनच्या कांड्यांचा वापर करण्यात आला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गावात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासनाने त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली असून पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत हा प्रकार गावातील स्थानिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. मात्र, या घटनेमागे काही मोठे षडयंत्र आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. स्फोटाची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक स्वतः पहाटेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावात पाहणी करून स्थानिकांशी चर्चा केली आणि तपासाचा आढावा घेतला. या घटनेबाबत कोणतीही अफवा पसरू नये, यासाठी पोलिसांनी जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले आहे.