Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रSantosh Deshmukh Murder Case : कृष्णा आंधळे आत्तापर्यंत तीनवेळा गावी येऊन गेला;...

Santosh Deshmukh Murder Case : कृष्णा आंधळे आत्तापर्यंत तीनवेळा गावी येऊन गेला; सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचा खळबळजनक दावा

बीड । Beed

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याच्या आरोपांनंतर आता तपासाला वेग आला आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबत एक खळबळजनक दावा केला असून, त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- Advertisement -

सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. तो जिवंत आहे की नाही, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा आंधळे गेल्या सहा महिन्यांत तब्बल तीन वेळा आपल्या गावी येऊन गेला आहे. यासंदर्भात सीआयडी (CID) कार्यालयाला माहिती देण्यात आली असून, तपासात ही बाब सत्य असल्याचे समोर आले आहे. आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याला शोधण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला होता. या लॅपटॉपमधील सर्व डेटा रिकव्हर करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. आरोपींनी आतापर्यंत आरोप निश्चिती (Charge Framing) टाळण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. मात्र, आता दोषारोप निश्चित झाले असून, येत्या सुनावणीत सर्व साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली जाणार आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवून लवकरात लवकर निकाल लागावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

येत्या ६ तारखेला होणाऱ्या सुनावणीत आरोपींची मालमत्ता आणि बँक खाती जप्त करण्याबाबत महत्त्वाची कार्यवाही होणार आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील या विषयावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सीझ केलेली बँक खाती आणि स्थावर मालमत्ता कायदेशीररित्या जप्त करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आरोपींच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.

“कृष्णा आंधळे आणि त्याचे साथीदार हे सैतानी वृत्तीचे लोक असून, त्यांच्यापासून आमच्या संपूर्ण कुटुंबाला जीविताचा धोका आहे,” अशी भीती धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे. फरार कृष्णा आंधळेला पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकून त्याची धिंड काढावी, अशी संतप्त मागणी त्यांनी केली आहे. वाल्मिक कराड याला या कटाचा मास्टरमाईंड मानले जात असून, आता फरार आरोपींच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....