येवला | प्रतिनिधी Yeola
तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश झालेल्या एका तरुण महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोग्य केंद्रात तीन ते चार तास ठिय्या आंदोलन करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली.
तालुक्यातील सोमठाण जोश येथील सुरेखा धुराडे यांना सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. नातेवाईकांच्या आरोपानुसार, केंद्रात सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध असूनही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही प्राथमिक उपचार प्रक्रिया न करता त्यांना पुढील उपचारासाठी येवला येथे पाठवले. मात्र, येवला येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असली तरी एकाची बदली झाली असून दुसरे अधिकारी प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेले होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असता नागरिकांनी संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आरोग्य केंद्रासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या आंदोलनात शिवसेनेचे शाखाप्रमुख अशोक आव्हाड, माजी सभापती डॉ. सुधीर जाधव, माजी सरपंच सुभाष वाघ, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर दराडे, दत्ता सानप, लक्ष्मण घुगे, पोपट आव्हाड, प्रमोद बोडके, बापू आशान, शिवाजी आव्हाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे




