Tuesday, May 7, 2024
Homeअग्रलेखसंयमाची आवश्यकता

संयमाची आवश्यकता

मातीचे आरोग्य जपण्याकडे बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी पुन्हा एकदा समाजाचे लक्ष वेधले आहे. पुढील पिढी सक्षम करण्यासाठी मातीचे संवर्धन व्हायलाच हवे. माती चांगली तर अन्न चांगले आणि अन्न चांगले म्हणजे माणूस चांगला असेही त्यांनी म्हंटले आहे. राहीबाई बीज बँक चालवतात.

त्यांच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या शेकडो पिकांचे गावरान वाण आहे. राज्यातीक अनेक शेतकरी गावरान बियाणे वापरतात असे सांगितले जाते. मातीचे आरोग्य आणि माणसाचे आरोग्य यात फारसा फरक नसतो असे तज्ज्ञ म्हणतात. माणसाच्या शरीर आणि मनाचे भरणपोषण आवश्यक असते तितकेच ते मातीचेही गरजेचे असते. अनेक कारणांमुळे माती प्रदूषित झाली आहे. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर मातीचा ऱ्हास करत आहे. मातीचे आरोग्य बिघडल्याने त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मानवी जीवनावर होतो याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. माती वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था स्वयंस्फूर्तीने कार्यरत आहे. इशा फाउंडेशनने तथा जग्गी वासुदेव यांनीही माती वाचवा अभियान राबवले. अनेक देशांना भेटी दिल्या. यांच्या या अभियानाला ‘देशदूत’नेही सक्रिय साथ दिली. नाशिकमध्ये असंख्य शेतकऱ्यांचा श्री. जग्गी वासुदेव यांच्याशी संवाद घडवून आणला. नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अशा प्रकारे केलेली शेती फायद्याची नसते असे म्हंटले जाते. अनेक शेतकरी तशी भावना व्यक्त करतात. तथापि नाशिकमधील अनेक शेतकऱ्यांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती आर्थिक फायद्याची करून ते गृहीतक खोटे ठरवले आहे. त्यांनी अनेक पिके घेतली आहेत. घेत आहेत. नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी नाशिकमध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचा एक मॉल चालवतात. कदाचित तशा प्रकारचा राज्यातील पहिलाच मॉल असावा. त्यांच्या शेतांना असंख्य शेतकरी भेटी देतात. सेंद्रिय शेती नक्कीच फायद्याची ठरते. तथापि त्यासाठी ज्ञान, कमालीचा संयम आणि काही वर्षे मातीला देण्याची तयारी ठेवावी लागते असे अनुभवाचे बोल ते शेतकरी सांगतात. अशा काही शेतकऱ्यांच्या मुलाखती ‘देशदूत’ने प्रसिद्ध केल्या आहेत. तथापि अशा शेतकऱ्यांची संख्या वाढायला हवी. मोठ्या प्रमाणात शेती सेंद्रीय व्हायला हवी. त्यासाठी सरकारने पाठबळ द्यावे असे शेतकऱ्यांना वाटते. लोकांचीही त्याला साथ शेतकऱ्यांना अपेक्षित असते. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतमाल तुलनेने महाग असतो असा लोकांचा आक्षेप असतो. तथापि रासायनिक पद्धतीने पिकवलेले अन्नध्यान्य सातत्याने खाल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात याकडे तज्ज्ञ वारंवार लक्ष वेधून घेतात. राहीबाईंनीही देखील अशाच जाणिवेतून बीजबँक उभारली. गावातील वाढते आजारपण अस्वस्थ करायचे. कुपोषित बालकांची संख्या वाढत होती. प्रदूषित अन्नधान्य रोगप्रतिकारक क्षमता कमी करत असावे असा विचार मनात आला. त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न म्हणजे बीजबँक असे त्या म्हणतात. राहीबाई त्यांचे काम करत आहेत. सामान्य माणसांनाही ‘आरोग्यम धनसंपदा’ यातील तथ्य पटत आहे. त्यामुळे लोकही हळूहळू सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतमालाकडे वळतील आणि शेतीला सामाजिक पाठबळही मिळेल अशी अपेक्षा करावी

- Advertisment -

ताज्या बातम्या