अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
श्रीराम नवमीनिमित्त शिर्डीत राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरूंपैकी चारजणांचा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत झालेल्यांपैकी एकाचे सोमवारी तर उर्वरित तिघांचे बुधवारी शव विच्छेदन करण्यात आले आहे. आता शव विच्छेदनानंतर मृतांच्या रासायनिक विश्लेषणाकडे (केमिकल एनालिसिस) सर्वांच्या नजरा लागल्या असून त्यात मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत अपेक्षीत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
सोमवारी विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील भिक्षेकरी गृहातील अत्यावस्थ दहाजणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असलेल्या भिक्षेकरूंपैकी अशोक बोरसे, सारंधर वाघमारे, प्रवीण घोरपडे आणि इस्सार शेख (वय 38) यांचा मृत्यू झाला. यातील एकाचा मृत्यू सोमवार, 7 एप्रिल रोजी झाला असून उर्वरित तिघांनी मंगळवार, 8 एप्रिल रोजी प्राण सोडले. सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन बुधवारी करण्यात आले. या शवविच्छेदनानंतर मृतांच्या शरिरातील नमुने रासायनिक विश्लेषणासाठी काढण्यात आले आहेत. त्याची शासकीय प्रयोग शाळेत तपासणी करण्यात येणार असून त्या आधारे संबंधीतांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात येणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पाठक यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदस्य म्हणून डॉ. शिवशंकर वलांडे, डॉ. दर्शना धोंडे-बारवकर आणि कनिष्ठ लिपिक दत्तात्रय धाडगे हे घडलेल्या प्रकाराची चौकशी करत आहेत. या समितीचा अहवाल पुढील आठवड्यात सोमवारी हाती येण्याची शक्यता असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
पळालेले भिक्षेकरू गायब
दरम्यान, उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयातून पळून गेलेल्या चार भिक्षेकरूंचा अद्याप तपास लागलेला नाही. या प्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून बेलवंडी पोलीस पुढील तपास करणार आहेत. याप्रकरणी आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल आहे.
भिक्षेकर्यांचा मृत्यू ही हत्याच- खा. लंके
जिल्हा रुग्णालयात झालेला चार भिक्षेकर्यांचा मृत्यू हा मृत्यू नसून हत्या आहे, असा आरोप नगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे खा. निलेश लंके यांनी केला आहे. एका युवा नेत्याच्या हट्टापायी 4 भिक्षुकांचा बळी गेला, असा दावा करताना माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकर्यांच्या मृत्यूची घटना समजल्यावर खा. लंके यांनी मंगळवारी रात्री उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्याचबरोबर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी खा. लंके म्हणाले, शिर्डी येथे भिक्षा मागून जगणार्या 50 भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले. त्यातील 10 भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. 2 दिवसात त्यातील 4 भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, पण हे मृत्यू नसून हत्या आहे, असा आरोप करून खा. लंके म्हणाले, या 10 भिक्षुकांपैकी 3 जण रुग्णालयातून पळून गेले. यावेळी पोलिस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते? 10 भिक्षुकांना रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्यांना रुग्णालयातील कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते का ? असा प्रश्न देखील खा. लंके यांनी उपस्थित केला.एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले, ही प्रशासनाची चूक आहे. याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला.