Saturday, July 27, 2024
Homeनगरबेलापूर ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

बेलापूर ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

बेलापूर |वार्ताहर| Belapur

येथील पिण्याच्या पाणी प्रश्नावर गेल्या काही महिन्यांपासून संतप्त झालेल्या अयोध्या कॉलनीतील नागरिकांनी अखेर काल माजी ग्रा. पं. सदस्य व ऐनतपूर सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर बुद्रुकचे सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍यांना घेराव घालून कार्यालयाला टाळे ठोकले.

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यांपासून गावात पिण्याचे पाणी पूर्णक्षमतेने येत नाही. तसेच जे पाणी येते ते गढुळ असल्याने पिण्यासाठी योग्य नसते. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन त्याची दखल घेत नाही. साठवण तलाव ते पाण्याच्या टाकी दरम्यानच्या मेन पाईपलाईनमध्ये कुठे तरी चोकअप झाल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी चोकअप काढल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. परिणामी नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही. काहीवेळा साठवण तलावात पुरेसे पाणी नसल्याचे कारण नागरीकांना सांगण्यात आले.

मात्र, पिण्याच्या पाण्याचे रोटेशन आल्याने साठवण तलाव भरूनही पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. या कारणाने संतप्त झालेल्या अयोध्या कॉलनीतील महिला व पुरुष नागरिकांनी आज अखेर ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सरपंच महेंद्र साळवी व ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांना घेराव घालून पाच दिवसांपासून अयोध्या कॉलनीत प्यायला पाणी नसल्याचा जाब विचारला आणि कार्यालयाला टाळे ठोकले. वारंवार तांत्रिक बाबी सांगून वेळ मारुन नेण्यापेक्षा आम्हाला पुर्ण क्षमतेने पिण्यासाठी नियमित पाणी द्या, अशी त्यांची मागणी त्यांनी केली.

यावेळी श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, चंद्रकांत नाईक, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र खटोड, रमेश अमोलीक, मुश्ताक शेख, माजी उपसरपंच शिरीन जावेद शेख, भूषण चंगेडे, ज्ञानेश्वर कुलथे, प्रकाश जाजू, सुनील डाकले, प्रसाद खरात, बाबूभाई शेख, विजय शेलार, रमेश शेलार यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान काल दुपारी कार्यालय उघडून कामकाज पूर्ववत सुरू झाल्याचे ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी सांगितले.

ही घटना घडल्यानंतर दुपारी ग्रामपंचायतीच्यावतीने जेसीबीच्या मदतीने मेन पाईप लाईनमधील चोकअप काढण्याचे काम पुन्हा सुरु करण्यात आले. कालपर्यंत त्यासाठी नऊ ठिकाणी पंधरा ते वीस फूट खाली खोदण्यात आले. मात्र, अद्याप चोकअप सापडले नाही. असे ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलिक यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन ही समस्या सोडविण्यात येईल. अयोध्या कॉलनीत तात्काळ टॅकर पाठविण्यात आले आहेत. चंदू नाईक व ग्रा. पं. सदस्य रमेश अमोलीक हे तिथे पाणी पुरवठा करण्यासाठी उपस्थित आहेत. पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरु आहे. तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे,

– महेंद्र साळवी, सरपंच, बेलापूर

पंचायतीतील सत्ताधारी मंडळींनी आपापसातील अर्थपूर्ण गटबाजीत एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या नादात ज्यांच्यामुळे आपण सत्तेत आलो, त्या नागरिकांची जिरविण्याचा उद्योग करु नये. जनतेला नागरी प्रश्नावर वेठीस धरल्यास जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. गावात सर्वत्र विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तात्काळ पूर्ण क्षमतेने पूर्ववत करावा.

– चंद्रकात नाईक, (माजी ग्रा. पं. सदस्य)

- Advertisment -

ताज्या बातम्या