Friday, May 3, 2024
Homeनगरस्वतःचे पाप झाकण्यासाठी माझ्यावर खोटेनाटे आरोप - जि. प. सदस्य शरद नवले

स्वतःचे पाप झाकण्यासाठी माझ्यावर खोटेनाटे आरोप – जि. प. सदस्य शरद नवले

बेलापूर (वार्ताहर) –

तत्कालीन सत्ताधार्‍यांनी 4 कोटी 17 लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकात उंच पाण्याच्या टाकीचे बांधकामाचा समावेशच नव्हता, त्यामुळे त्या कामात मी खोडा घालण्याचा

- Advertisement -

प्रश्न येतो कुठे? तसेच पाण्याची टाकी पाडण्याबाबतचा विषय पंचायतीच्या कोणत्याच सभेपुढे आलेला नसताना त्याबाबत चुकीची माहिती देऊन स्वतःचे पाप झाकण्यासाठी विरोधकांनी खोटेनाटे आरोप करुन ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला, असा खुलासा जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

शरद नवले पुढे म्हणाले की, मी सरपंच असताना 1.5 एमएलडी क्षमतेचा फिल्टर प्लॅन्ट बांधला. परंतु त्यांनी तो वेळोवेळी वॉशआऊट करुन आवश्यक ती देखभाल न केल्याने तो खराब झाला. परिणामी गावाला दूषित पाणी प्यावे लागले. तसेच फिल्टर प्लॅन्ट ग्रामपंचायतीने बांधला आहे, असे तत्कालीन सत्ताधार्‍यांनी प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकात का लिहून दिले? म्हणजेच फिल्टर प्लॅन्ट गायब झाल्याच्या आरोपात तथ्य नाही. त्यांनी वेळीच पाण्याच्या टाकीचे काम हाती घेतले असते तर हा प्रश्नच उद्भवला नसता. मात्र स्वतःचे पाप झाकण्यासाठी ते निराधार व खोटेनाटे आरोप करीत आहेत, असेही शरद नवले यांनी स्पष्ट केले.

सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की, मी उपसरपंच असताना पाण्याच्या टाकीबाबतचे ते पत्र कोणत्याही बैठकीपुढे मांडले नसल्याने त्याची इतिवृतात नोंद नाही. सरपंच झाल्यावर कागदपत्रे चाळताना ते लक्षात आल्याने गांभीर्याची बाब म्हणुन ते लोकांपुढे आणले आहे. माजी सत्ताधार्‍यांनी 13 कोटींची प्रस्तावित पाणी योजना केल्याचा पुरावा दप्तरी कुठेच सापडत नाही. त्यामुळे केवळ जनतेची दिशाभूल ते करीत आहेत. वास्तविक ज्या काळात जे सरपंच होते, त्यांनीच याबाबत खुलासा देणे आवश्यक असताना ज्यांना निवडणुकीत जनतेने नाकारले तेच खुलासा देत आहेत. नवीन टाकीचे बांधकाम पुर्ण होण्यासाठी दोन वर्षे लागतील. मात्र दरम्यान टाकी पडुन दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? तसेच गावाला पाणीपुरवठा कसा होणार? असा सवालही सरपंच साळवी यांनी उपस्थित केला.

उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी सांगितले की, 1971 साली बेलापूर पाणी योजनेचे भूमिपूजन स्व. सरपंच घमाजी कुर्‍हे यांच्या कार्यकाळात झाले. परंतु 1972 ते 1977 या काळात स्व. सरपंच भागवतराव खंडागळे यांच्या कार्यकाळात योजनेची लोकवर्गणी भरुन सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. तळ्यासाठी शेती महामंडळाकडुन जागा हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर 1977 मध्ये पाणी योजना पूर्ण होऊन ग्रामदैवत श्री. हरिहर केशव गोविंदांना जलाभिषेक घालण्यात येऊन योजनेचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. नंतर खाजगी कनेक्शन देण्यासंबंधी नियमावली बनविण्यात आली. एक वर्ष गावाला पाणीपुरवठाही झाला. ग्रामपंचायतीकडे तांत्रिक स्टाफ नसल्याने एक वर्षासाठी जीवन प्राधिकरणाद्वारे चालविली.1978 मध्ये शासनाने ही योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग केली.असा खुलासा उपसरपंच खंडागळे यांनी केला. यावेळी सदस्य चंद्रकांत नवले, मुश्ताक शेख, रमेश अमोलिक, सौ. प्रियांका कुर्‍हे, यांच्यासह अशोक गवते, सचिन अमोलिक, प्रभात कुर्‍हे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या