Saturday, July 27, 2024
Homeनगरआरोपीला भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर

आरोपीला भेटण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओंकार भागानगरे खूनप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी गणेश हुच्चे याची भेट घेण्यासाठी आरोपीचा भाऊ म्हणून अमोल हुच्चे या नावाने बनावट आधारकार्ड करून त्या नावाने भेट घेत कारागृह प्रशासनाची दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट आधारचा वापर करणार्‍याचे नाव अमोल येवले असून त्याने कारागृह प्रशासनाची दिशाभूल केल्याची फिर्याद तुरुंग अधिकारी सुवर्णा शिंदे यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

गणेश हुच्चे हा आरोपी ओंकार भागानगरे याचा खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात बंदी आहे. त्याची येवले याने अमोल हुच्चे या नावाने बनावट आधारकार्ड तयार करून 6 ऑक्टोबर रोजी भेट घेतल्याची तक्रार पांडुरंग भागानगरे यांनी केली होती. आरोपी गणेश हुच्चे याची भेट घेणारा अमोल हुच्चे हा त्याचा भाऊ नसून त्याचे नाव अमोल येवले आहे. त्याच्या बनावट आधारकार्डचा आमच्याकडे पुरावा आहे, अशी तक्रार करत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी भागानगरे यांनी केली. आरोपींच्या नातेवाईकांचे नाव, पत्ता आधारकार्ड व पॅनकार्ड नंबर घेऊन आरोपीच्या नातेवाईकांना भेटण्यास वेळ दिली जाते.

मात्र, कारागृहाकडे आधारकार्ड व पॅनकार्ड बनावट आहे किंवा खरे आहे, याची पडताळणी करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. कारागृहाच्या नियमालीनुसार आरोपी गणेश हुच्चे याची अमोल हुच्चे याने भेट घेतली असल्याची नोंद आहे. कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचारी सुजाता काकडे, स्वाती लांडगे, संगीता केकाण, मिरा हेंगडे, सुरेखा पवार यांनी आधारकार्डची खात्री करूनच भेट दिलेली आहे. अमोल हुच्चे या नावाने आधारकार्ड असून त्याने आरोपीचा भाऊ म्हणून बनावट आधारकार्ड वापरून बोगस भेट घेतल्याची तक्रार आहे. त्याने कारागृह प्रशासनाची दिशाभूल करून तोतयेगिरी करण्याच्या उद्देशाने बनावट आधारकार्ड वापल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या