Friday, November 22, 2024
Homeनगरभंडारदरातील पाणीसाठा 6000 दलघफूवर

भंडारदरातील पाणीसाठा 6000 दलघफूवर

निळवंडे 25 टक्के भरण्याच्या मार्गावर, मुळा नदीही दुथडी

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात मान्सून गुरूवारी रात्रीपासून पुन्हा सक्रीय झाला असून सोमवारपासून आषाढसरी जोरदार बरसत आहेत. परिणामी गत 24 तासांत तब्बल 580 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 5947 दलघफू झाला होता. पाऊस सुरूच असल्याने रात्री हा पाणीसाठा 6000 दलघफूच्या पुढे सरकला आहे.

- Advertisement -

दरम्यान, भंडारदरात पाऊस सुरू असल्याने वाकी तलावातून वाढलेला विसर्ग तसेच परिसरातील ओढेनाल्याचे पाणी येत असल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 22 टक्क्यांवर पोहचला होता. आज-उद्या हा पाणीसाठा 25 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. काल सोमवारी आषाढसरींचा काहीसा जोर आणखी वाढला होता. भंडारदरात काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 11 मिमी झाली आहे. वाकीचा ओव्हरफ्लो ही 376 क्युसेकपर्यंत वाढला आहे. भंडारदरातील पाणीसाठा आज 55 टक्क्यांच्यापुढे सरकणार आहे.

मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगड परिसरात काल सोमवारी दिवसभर संततधार सुरू होती. कालपासून पावसाला जोर वाढल्याने मुळा नदी अकोलेत दुथडी वाहू लागली आहे. मुळा नदीचा सकाळी 4024 विसर्ग होता तर सायंकाळी तो 8028 क्युसेकपर्यंत झाला.त्यामुळे आज मंगळवारी धरणात पाणी वाढणार आहे. पाणलोट क्षेत्रात कुमशेत, आंबित, पाचनई, कोथळा, हरिश्चंद्रगड परिसरात पावसाने जोर धरल्याने मुळा धरणाचा साठा 9598 दशलक्ष घनफूट झाला असून धरण 37 टक्के भरले आहे.

कुकडीचा पाणीसाठा 20 टक्के

दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या कुकडी प्रकल्प धरणांमध्ये हळुहळु पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे या प्रकल्पात कालअखेर 20 टक्के पाणीसाठा झाला आहे. जूनअखेर या प्रकल्पात केवळ 4 टक्के पाणीसाठा होता. या समूह धरणात एकूण पाणीसाठा 5789 दलघफू झाला होता. या प्रकल्पातील सर्वाधिक क्षमता असलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठा 28 टक्क्यांवर पोहचला आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 3485 दलघफू झाला आहे. येडगाव 33 तर वडज 34 टक्के भरले आहे.

जोरदार पावसाने धरणांच्या साठ्यात वाढ

दारणा 56, भावली 76, तर गंगापूर 33.85 टक्क्यांवर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणाच्या पाणलोटात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने दारणात काल सकाळ पर्यंत 286 दलघफू पाणी 24 तासांत दाखल झाले. दारणाचा साठा काल सकाळ पर्यंत 56.06 टक्क्यांवर पोहचला आहे. भावली 75.76 टक्क्यांवर तर गंगापूरचा साठा 24 तासांत 33.66 टक्क्यांवरून 33.85 टक्के इतका आहे. काल सकाळ पर्यंत दारणाच्या पाणलोटातील घोटीला मागील 24 तासांत 39 मिमी, इगतपुरीला 68 मिमी, दारणाला 11 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने दारणात 24 तासांत 286 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 4008 दलघफू पाणीसाठा झाला आहे. म्हणजेच 4 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मुकणे 17.35 टक्के, वाकी 13.96 टक्के, भाम 56.74 टक्के, भावली 75.66 टक्के असे साठे काल सकाळपर्यंत झाले. काल सकाळी मुकणेच्या भिंतीजवळ 14 , वाकी 31, भाम 94, भावली 62 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण कमी आहे. 25 मिमी, पाणलोटातील त्र्यंबक येथे 13 मिमी, अंबोली येथे 59 मिमी पावसाची नोंद झाली.कश्यपीला 12 मिमी, गौतमी गोदावरी 19 , कडवा 8 मिमी, आळंदी 19 मिमी असा पाऊस काल सकाळ पर्यंत नोंदला गेला. गंगापूरचा साठा 33.85 टक्के इतका आहे. 5630 दलघफू क्षमतेच्या या धरणात 1906 दलघफू पाणी साठा झाला आहे. गंगापूर मध्ये 24 तासांत 11 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. कश्यपीत 12.53 टक्के, गौतमी गोदावरीत 30.14 टक्के, कडवा 49.64 टक्के, आळंदी 3.55 टक्के असे साठे आहेत. दरम्यान गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात पावसाने गुंगारा मारला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या