Wednesday, January 7, 2026
HomeनगरBhandardara : प्रवरा, मुळा नद्या दुथडी

Bhandardara : प्रवरा, मुळा नद्या दुथडी

निळवंडेतून विसर्ग वाढविला, पाणलोटात पावसाचा जोर कायम

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर|Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योगाला चालना देणार्‍या भंडारदरा आणि मुळा धरण पाणलोटात श्रावणसरींचा शुक्रवार, शनिवारनंतर रविवारीही जोर कायम होता. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने होऊ लागली आहे. परिणामी होणार्‍या आवकेनुसार कमी अधिक विसर्ग सोडण्यात येत आहे. पाऊस सुरू असल्याने मुळा, प्रवरा नदी दुथडी वाहत आहेत.

- Advertisement -

पाणलोटात पावसाचा जोर टिकून असल्याने डोंगरदर्‍यांमधील धबधबे जोमाने सक्रिय झाले असून ओढेनाले भरभरून वाहत धरणात विसावत आहेत. परिणामी धरणाची पातळी वाढत आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सकाळपर्यंतच्या 24 तासांत 723 दलघफू पाणी जमा झाले. साठा 9541 दलघफू (86.43 टक्के) झाला होता. पाऊस सुरूच असल्याने नियमानुसार जुलै अखेर 85 टक्के पाणीसाठा झाल्यावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतो. पाऊस सुरू असल्याने भंडारदरातून सकाळी 9641 क्युसेसने विसर्ग सोडणे सुरू होते. सायंकाळी 9329 क्युसेसने सुरू होता.

YouTube video player

निळवंडेतही पाण्याची आवक वेगाने होऊ लागली आहे. या धरणात काल सकाळपर्यंत 410 दलघफू पाण्याची आवक झाली. काल सकाळी 7368 दलघफू पाणीसाठा होता. या धरणातून 9472 क्युसेसने प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यानंतर आवक वाढल्याने सायंकाळी 14998 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. आढळा पाणलोटातही पाऊस सुरू असल्याने या धरणातून 277 क्युसेसने विसर्ग सोडण्यात येत आहे. अकोले तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. वाकीयेथे 78, निळवंडे 42, अकोले 37, आढळात 28 मिमी पावसाची नोंद झाली.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा नदी पाणलोट क्षेत्रात कोतुळ, हरिश्चंद्रगड परिसरात पावसाची संततधार असल्याने मुळा नदीतील पाणी टिकून आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यात वाढ होऊन 23,076 क्युसेसने पाणी मुळा धरणाकडे झेपावत होते.पावसाचा काहीसा जोर ओसरल्याने हा विसर्ग 9541 क्युसेकपर्यंत ओसरला.पण नंतर पाऊस वाढल्याने पुन्हासंध्याकाळी 14806 क्युसेस आवक सुरू होती.

मुळा नदी पाणलोट क्षेत्रात अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसर व कोतूळ परिसरात पावसाची संतत धार आजही सुरूच होती पावसाबरोबर जोरदार वार्‍या सह श्रावण सरी कोसळत आहेत. काल सकाळपर्यंत धरणात नव्याने 644 दलघफू पाणी दाखल झाल्याने मुळा धरणात 20 हजार 252 दलघफू इतका पाणीसाठा झाला आहे. आज अखेर मुळा धरणात 11,346 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे कोतुळ येथे काल 24 मिमी पावसाची नोंद झाली.

साठा –

भंडारदरा 9800 दलघफू (88.78 टक्के), निळवंडे 7451 दलघफू (89.47 टक्के), मुळा 20252 दलघफू (77.79 टक्के), डिंभे 10990 दलघफू (88 टक्के)

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...