Wednesday, January 7, 2026
HomeनगरAkole : भंडारदरा धरणाचा 99 वर्षांचा प्रवास पूर्ण

Akole : भंडारदरा धरणाचा 99 वर्षांचा प्रवास पूर्ण

दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम हाती घेण्याची गरज

अकोले |प्रतिनिधी| Akole

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनरेखा असणारे भंडारदरा धरण बुधवारी (दि.10) 99 वर्षांचे झाले. शंभराव्या वर्षात प्रवेश करताना या धरणाच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे रखडलेले काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे.

काळ्या पाषाणातील या ब्रिटिशकालीन धरणाच्या निर्मितीची कथा रोमांचक अशीच आहे. संगमनेर तालुक्यातील ओझर येथे 1893 मध्ये प्रवरा नदीवर बांधलेल्या बंधार्‍यातून अधिक क्षेत्राला तसेच उन्हाळ्यातही पाणीपुरवठा करता यावा यासाठी साठवण तलाव म्हणून भंडारदरा गावाजवळ दगडी धरण बांधण्याचे ठरविण्यात आले. ऑगस्ट 1907 मध्ये धरण बांधण्याच्या या प्रस्तावास मंजुरी मिळाली. बांधकामासाठी भंडारदरा येथे स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली. भंडारदर्‍यापासून जवळचे रेल्वेस्थानक घोटी होते.

- Advertisement -

तेथून यंत्रसामग्री आणि इतर सामान भंडारदर्‍याला आणण्यात येणार होते. त्यासाठी घोटी-कोल्हार मार्गापासून पेंडशेत, चिचोंडी ते भंडारदरा असा चार मैल लांबीचा नवीन रस्ता तयार करण्यात आला. धरणाची भिंत दगड आणि चुन्यात बांधण्यात आली आहे. दगड खाणीतून दगड वाहतुकीसाठी ट्रामलाईन टाकण्यात आली होती. तसेच गाढवावरून आणि बैलगाडीनेही दगडाची वाहतूक केली जात होती. धरणात अंशतः पाणी साठू लागल्यानंतर होडीने बांधकाम स्थळावर दगड आणले जात.

YouTube video player

वासाळी आणि कातळापूर येथे लाईम डेपो तयार करण्यात आले. धरणाच्या बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा (क्रश संड) वापर करण्यात आला आहे. ही कृत्रिम वाळू धरण परिसरातच तयार केली जात असे. प्रत्यक्ष धरण बांधकामास 1910 मध्ये सुरुवात करण्यात आली. पहिल्या तीन वर्षातच भिंतीचे 75 फूट उंच बांधकाम झाले होते. 1920-21 मध्ये भिंतीचे बांधकाम 200 फूट उंचीपर्यंत पोहचले होते. त्याच वर्षात नोव्हेंबर 1920 मध्ये धरणातून प्रथमच सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले. ऑगस्ट 1916 मध्ये धरण परिसरात प्लेगचा प्रादुर्भाव झाला. तेव्हा प्लेगसाठी स्वतंत्र डॉक्टरची तसेच प्लेग इन्स्पेक्टरची नेमणूक करण्यात आली होती. 1918-19 या वर्षात जिल्ह्या प्रमाणे अकोले तालुक्यातही मोठा दुष्काळ पडला होता. या कसोटीच्या काळात भंडारदरा धरणाने सुमारे आठ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देत मोठा आधार दिला.

मूळ प्रस्तावानुसार 250 फूट उंचीचे धरण बांधून त्यात 240 फुटापर्यंत पाणी साठवण्याचे नियोजन होते. पण पुढे आधी 260 फूट आणि नंतर 270 फूट उंचीपर्यंत धरण बांधकाम करावयाचे व त्यात 260 फूट उंचीपर्यंत पाणी साठवायचे असे निश्चित करण्यात आले. बांधले तेव्हा भंडारदरा हे देशातील सर्वात उंच धरण होते. 1910 मध्ये सुरू झालेल्या या धरणाचे बांधकाम 1926 मध्ये पूर्ण झाले. 10 डिसेंबर, 1926 रोजी तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते धरणाचे लोकार्पण करण्यात आले. 1940-41 मध्ये धरणाच्या सांडव्यावर पाच साडेपाच फूट उंचीची भिंत बांधण्यात आली. त्यामुळे आता धरणात 265.70 फूट उंचीपर्यंत पाणी साठवण्यात येते. त्यामुळे धरणाची क्षमता 11 हजार 39 दशलक्ष घनफूट झाली आहे.

भंडारदरा धरणाचा शतक महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने जलाशयाच्या संवर्धनासाठी व भागात निसर्ग पर्यटनाच्या संधी निर्माण करून देण्यासाठी उपाययोजना सूचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शताब्दी महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री हे देखील या समितीचे सदस्य आहेत.

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...