Sunday, October 6, 2024
Homeनगरघाटघर 9, रतनवाडीत 8 इंच पाऊस तर दारणा 23 टक्क्यांवर

घाटघर 9, रतनवाडीत 8 इंच पाऊस तर दारणा 23 टक्क्यांवर

पाणीसाठा 27 टक्क्यांवर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचेे पाणी, व्यापार आणि उद्योगांसाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सलग दुसर्‍या दिवशीही आषाढ सरींनी तांडव केल्याने गत 24 तासांत धरणात नव्याने विक्रमी 680 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 2948 दलघफू (26.71 टक्के) झाला होता. वाकी तलाव भरल्याने, कृष्णवंती नदी वाहती झाल्याने निळवंडे धरणातही आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 147 दलघफू पाण्याची आवक झाली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 874 दलघफू झाला होता.

पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर आणि रतनवाडीत अक्षरशः धो-धो पाऊस कोसळ आहे. आषाढ सरी तुफानी बरसत असल्याने डोंगरदर्‍यांमधून धबधबे आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. ओढेनाल्यांना पूर आला आहे. भातखाचरांमध्ये तुंडूब झाली आहेत. सर्वत्र पाणीच पाणी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. काल सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने तब्बल 463 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 2732 दलघफू (24.74 टक्के) साठा झाला होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला.

शुक्रवारी रात्री घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पावसाची तुफानी बॅटींग केल्याने सायंकाळी संपलेल्या 12 तासांत आणखी 217 दलघफू पाणी नव्याने आले. गत 24 तासांत धरणात नव्याने 680 दलघफू पाणी आले. या हंगामातील आतापर्यंतचा विक्रम आहे. धरणातील पाणीसाठा 2948 दलघफू (26.71 टक्के) झाला होता. काल दिवसभरही पाणलोटात पावसाचा जोर कायम असल्याने दरम्यान, रविवारी दुपानंतर पाऊस कमी झाल्याने धरणातील पाण्याची आवक मंदावली होती. गत 24 तासांत पडलेला पाऊस असा-भंडारदरा 35, घाटघर 230, पांजरे 192 आणि रतनवाडी 205. 112 दलघफू क्षमतेचे वाकी तलावही ओव्हरफ्लो झाला असून 556 क्युसेकने पाणी सुरू आहे. यामुळे आता निळवंडे धरणातही नवीन पाण्याची आवक वाढु लागली आहे.

मुळात 239 दलघफू आवक

कोतूळ |वार्ताहर| Kotul

दक्षिण नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचेे पाणी, व्यापार आणि नगर एमआयडीचे भवितव्या अवलंबून असलेल्या मुळा धरणाच्या अकोलेतील पाणलोटात कालपासून आषाढ सरींनी जोर धरल्याने अकोलेत मुळा नदी दुथडी वाहु लागली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 239 दलघफू पाणी दाखल झाल्याने धरणातील पाणीसाठा 6257 दलघफू (24.06 टक्के) झाला होता. काल दिवसभरही आवक सुरू होती. शनिवारी रात्री हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणात पहिल्यांदाच एवढ्या प्रमाणात आवक झाली. शनिवारी कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 13375 क्युसेक होता. पण नंतर पावसाचा जोर कमी झाला.

दारणा 23 टक्क्यांवर तर भावली 27 टक्क्यांवर

24 तासात दारणात 426, तर गंगापूर मध्ये 77 दलघफू नविन पाणी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील घोटी, इगतपुरी परिसरात मध्यम स्वरुपाची पावसाने हजेरी लावली. यामुळे दारणात 24 तासांत 426 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. दारणा 23 टक्क्यांवर पोहचले आहे. भावलीत 42 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. भावली 27.48 टक्के भरले आहे. तर गंगापूर मध्ये 77 दलघफू पाणी दाखल झाले. गंगापूर 24.60 टक्के इतके झाले आहे.

रविवारी दिवसभर पावसाने काहिशी उघडीप दिली होती. परंतु परवाच्या पावसाने पाण्याची आवक सुरुच आहे. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 10 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 47 मिमी, घोटीला 33 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणात 24 तासांत 426 दलघफू नविन पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 1609 दलघफू साठा आहे. या धरणात दीड टीएमसी हुन अधिक पाणीसाठा झाला आहे. भावलीच्या भिंतीजवळ 91 मिमी पावसाची नोंद झाली. या मुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढु लागली आहे. काल मागील 24 तासात भावलीत 42 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. भावली धरणाचा साठा 27.48 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. भावलीच्या पाणलोटातील घाटमाथ्यावर पावसाचे जोरदार आगमन होत आहे.

मुकणे धरणात 5.62 टक्के साठा तयार झाला आहे. मुकणेच्या भिंतीजवळ 30 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 24 तासात 139 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. वाकी धरणात 2.33 टक्के पाणीसाठा झाला. वाकीत 8 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. वाकी परिसरात 32 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वालदेवीत 8.74 टक्के साठा आहे. वालदेवी परिसरात 15 मिमी पावसाची नोंद झाली. वालदेवीत 40 दलघफू नवीन पाण्याची नवीन आवक झाली. तर कडवा धरणात 19.08 टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. या धरणात 108 दलघफू नवीन पाणी 24 तासांत दाखल झाले.

गंगापूर धरण 24.60 टक्क्यांवर पोहचले आहे. या धरणाच्या भिंतीजवळ काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासांत 30 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोटातील त्र्यंबक येथे 52 मिमी, अंबोली 81 मिमी असा पाऊस नोंदला गेला. गंगापूर मध्ये 77 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. कश्यपीच्या भिंतीजवळ 40 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 4.97 टक्के पाणी साठा आहे. गौतमी गोदावरी च्या भिंतीजवळ 32 मिमी पावसाची नोंद झाली. याधरणात 24 तासांत 50 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे धरण 15.15 टक्के भरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या