Sunday, September 29, 2024
Homeनगरभंडारदरा, मुळा पाणलोटात आषाढसरींचे तांडव सुरू

भंडारदरा, मुळा पाणलोटात आषाढसरींचे तांडव सुरू

भंडारदरा काही तासांत निम्मे भरणार || मुळात पाण्याची आवक वाढणार || भावली निम्मे भरले

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा वाढला, त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वाढली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल रात्री 4400 दलघफू (40टक्के) झाला होता. तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 32 टक्क्यांवर पोहचला आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसाची भंडारदरातील नोंद 17 मिमी झाली. दरम्यान, रात्री 10 वाजेनंतर आषाढ सरींनी तांडव करण्यास सुरूवात केली होती. पावसाचा जोर असाच टिकल्यास दोन दिवसांत भंडारदरा धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. तसेच मुळा नदीतील विसर्ग वाढणार असून धरणातही आवक वाढणार आहे.

- Advertisement -

भंडारदरा परिसरात पाऊस सुरू असल्याने निळवंडे धरणात नवीन पाणी येत आहे. या धरणात काल 1503 दलघफू पाणीसाठा झाला होता. दोन दिवसांपासून पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर आणि रतनवाडीत तीन इंचापेक्षाही अधिक पाऊस झाला. पाणलोशात आषाढ सरींनी फेरा धरल्याने रात्री 8 वाजता संपलेल्या 26 तासांत तब्बल 525 दलघफू पाणी आल्याने धरणातील पाणीसाठा 4400 दलघफूंवर पोहचला. भंडारदरात पाऊस होत असल्यान निळवंडेतीलही पाणीसाठा वाढत आहे. गत 24 तासांत पडलेला पाऊस असा मिमीध्ये भंडारदरा 27, घाटघर 89, पांजरे 77, रतनवाडी 82.

मुळा पाणलोट क्षेत्रात काल रविवारी आषाढ सरींची संततधार सुरू होती आंबित, पाचनई, कुमशेत या भागात सरींचा अधिक जोर होता यामुळे मुळा नदीचा प्रवाह टिकून राहिला सकाळी कोतूळ येथून मुळे चा विसर्ग 5327 क्युसेस होता तर सायंकाळी तो 3416 क्युसेस होता. विसर्ग टिकून असल्याने मुळा धरणातील साठा 7995 दलघफूट झाला आहे.
दरम्यान, भंडारदरा पाणलोटातील सौंदर्य फलले असून ते न्याहाळण्यासाठी काल रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

भावली निम्मे भरले

दारणा, गंगापूर पाणलोटात पावसाचा जोर वाढला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल दिवभर घोटी, इगतपूरी च्या घाटमाथ्यावर मध्यम स्वरुपाच्या पावसाची रिपरिप सुरु होती. सायंकाळी काहीशी विश्रांती या पावसाने घेतली. या पावसाने दारणा धरणात पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळपर्यंत दारणात 1 जून पासून आतापर्यंत अडीच टीएमसी पाण्याची आवक झाली. भावली धरणातील पाणीसाठा रात्री उशीरा निम्मा झाला आहे. दारणा 37 टक्क्यांवर, तर गंगापूर 31 टक्क्यांवर पोहचले आहे.

काल रविवारी दारणाच्या पाणलोटात पावसाची मध्यम स्वरुपाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे दारणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 14 मिमी, लाभक्षेत्रातील घोटी येथे 54, इगतपुरीला 95 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दारणात 160 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. 7149 दलघफू क्षमतेच्या दारणात 2665 दलघफू साठा तयार झाला आहे. हे धरण 37.28 टक्के भरले आहे. 1 जूनपासून या धरणात 2411 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. शेजारील भावली धरणात 24 तासांत 40 दलघफू पाण्याची आवक झाली.

भावली 48.74 भावली 48.74 टक्क्यांवर पोहचले होते. रात्री उशीरा हे धरण निम्मे भरलेे. 1434 दलघफू क्षमतेच्या या धरणात 720 दलघफू पाणीसाठा आहे. काल या धरणाच्या भिंतीजवळ 57 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाकी धरण 6.02 टक्के, मुकणे 10.32 टक्के, भाम 41.92 टक्के, वालदेवीत 15.53 टक्के असे पाणी साठे दारणा समुहात आहेत.
गंगापूर धरण 30.67 टक्के भरले आहे. 5630 क्षमतेच्या गंगापूर 1727 दलघफू पाणीसाठा आहे. या धरणात 94 दलघफू पाणी 24 तासात दाखल झाले. पाणलोटातील त्र्यंबक येथे 32 मिमी, अंबोली येथे 52, नाशिक ला 12, गौतमी गोदावरीला 28, कश्यपी ला काल 38 मिमी पावसाची नोंद झाली. कश्यपी 9.45 टक्के, गौतमी गोदवरी 22.38 टक्के, कडवा 30.04 टक्के, आळंदी 2.57 असे टक्के पाणी साठे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या