अकोले |प्रतिनिधी| Akole
आगामी विधानसभा निवडणुकी विषयी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी आग्रही मागणी भंडारदरा धरणाच्या ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ या नामकरण सोहळ्याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. निवडणूक लढवायची किंवा नाही. यासाठी कार्यकर्त्यांनी बैठक बोलावावी. त्यामध्ये एकत्र बसून निर्णय घेऊ, असे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी परिसरातील हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते. अकोले तालुक्यात असणार्या भंडारदरा धरणाचे नामकरण ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’असा अध्यादेश 4 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने काढला होता. हा नामकरण सोहळा काल बुधवारी भंडारदरा धरणावर पार पडला. आता हे धरण ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ या नावाने संबोधले जाणार आहे. या धरणाला क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात यावे, यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये भंडारदरा धरणावर मोठे आंदोलन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी माजी आदिवासी मंत्री मधुकरर पिचड होते. याप्रसंगी ते म्हणाले की, माझ्या हस्ते आज मोठा ऐतिहासिक नामकरण सोहळा पार पडत आहे. हा माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तालुक्यात असे अनेक क्रांतिकारक अनेक गावांमध्ये असून त्या-त्या गावात त्या क्रांतिकारकांची स्मारके व्हावीत, असे मला वाटते. आपले क्रांतिकारक हे शाकाहारी होते, ते दारू पित नव्हते मात्र आता अकोलेमध्ये 9 ऑगस्ट हा क्रांतिदिन दारू पिवून साजरा होत आहे.ही आपली संस्कृती नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ यांनी क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्याविषयी माहिती देत आज शाळेत क्रांतिकारकांचा इतिहास मुलांपुढे चुकीचा येत आहे. त्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. हा कार्यक्रम जरी वेगळा असला तरी मधुकर पिचड यांचे तालुक्यासाठी असलेले योगदान पहाता वैभव पिचड यांना आमदार केल्याशिवाय थांबणार नाही असे स्पष्ट केले. यावेळी हेमलताताई पिचड, मंगलदास भवारी, सिताराम भांगरे, गोविंदराव साबळे, शिवाजीराव धुमाळ, काळू भांगरे, दादाभाऊ बगाड, पांढरे पाटील, पांडुरंग खाडे, भरत घाणे, सुनील सारुक्ते, सिताराम देशमुख, राजेंद्र देशमुख, सोमनाथ मेंगाळ, काळू बुळे, संपत झडे, ज्ञानेश्वर झडे, सुरेश गभाले, अनंत घाणे, संतोष सोडणर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवराम कोंडार यांनी केले. आभार भरत घाणे यांनी मानले.