Sunday, September 8, 2024
Homeनगरभंडारदरात पाऊस सुरूच!

भंडारदरात पाऊस सुरूच!

2500 दलघफू पाणी दाखल, साठा आज 80 टक्क्यांच्या पुढे जाणार

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर, पांजरे, रतनवाडीत अतिसृष्टी सुरू असल्याने हा भाग गारठून गेला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंगरदर्‍यातील आदिवासी बांधवांचे प्रचंड हाल होत असून पिके पाण्याखाली गेली आहेत तर जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. या बांधवांना तातडीने मदत करावी अशी जोरदार मागणी होत आहे.

- Advertisement -

गत दोन दिवसांपासून या भागात पावसाने कहर केला आहे.भंडारदरा, घाटघर, पांजरे, रतनवाडीत तुफानी पाऊस होत असल्याने डोंगरदर्‍यांमधील धबधब्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. तर छोट्या नद्या, ओढे नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे पाण्याचे लोंढेचे लोढें विसावत असल्याने तासागणिक धरणाचे पोट फुगू लागले आहे. घाटघर 14, रतनवाडी, पांजरेत प्रत्येकी 13 इंच पाऊस झाल्याने गत 24 तासांत तब्बल 2500 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. हा हंगामातील आणखी एक विक्रम आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 8060 दलघफू (76.64 टक्के) झाला होता. पाऊस सुरूच असल्याने तसेच पाण्याची आवक पाहता आजसकाळपर्यंत हा पाणीसाठा 80टक्क्यांपर्यंत वाढलेला असेल.

घाटघर आणि रतनवाडीत तुफानी पाऊस सुरू असल्याने जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. भातखाचरांमधून पाणी वाहत आहे. डोंगरदर्‍या, रस्ते धुक्यांनी अंधारून गेले आहेत. या पावसामुळे जनजीवन गारठून गेले आहे. जनावरांचे हाल सुरू असून धुण्याचा आधार घेतला जात आहे. जनावरेही एकाच ठिकाणी बांधून ठेवल्या आहेत. गारठ्यामुळे जनावरेही गारठून गेले आहेत.

आढळा 66 टक्के पाणी
अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यांतील 20 गावांतील लाभक्षेत्राचे सिंचन करणार्‍या देवठाण येथील आढळा धरणातील पाणीसाठा 66 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सकाळी 702दलघफू झाला आहे. काल सकाळी संपलेल्या या पाणीसाठ्यामुळे लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

निळवंडे पाणीसाठा 40 टक्क्यांवर
निळवंडे धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत पडलेल्या पावसाची नोंद 180 मिमी झाली आहे. वाकीचा ओव्हरफ्लो 1889 क्युसेकने सुरू आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 3192 दलघफू झाला होता. त्यानंतरही आवक सुरूच असल्याने हा पाणीसाठा रात्री 40 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या