Tuesday, September 17, 2024
Homeनगरभंडारदरातील पाणीसाठा 87 टक्के

भंडारदरातील पाणीसाठा 87 टक्के

आढळा ओव्हरफ्लोच्या मार्गावर, मुळात 5327 क्युसेकने आवक

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

पाणलोटात अधून मधून आषाढसरी कोसळत असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा आज मंगळवारी 87 टक्के होत असून आता उत्सुकता ओव्हरफ्लोची आहे. दरम्यान 1060 दलघफू क्षमतेच्या आढळा धरणातीलही पाणीसाठा 90 टक्क्यांवर आला असून याही धरणातून कोणत्याहीक्षणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.
भंडारदरा पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर, पांजरे, रतनवाडीत अधून मधून आषाढ सरी कोसळत असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळपर्यंत 242 दलघफू पाणी आले. त्यापैकी वीज निर्मितीसाठी 35 दलघफू पाणी खर्च झाले.

तर 207 दलघफू पाणी साठ्यात जमा झाले. त्यामुळे11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 9519 दलघफू (86.23 टक्के) झाला आहे. आज हा साठा 87 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढल्यास हेही धरण लवकरच ओव्हरफ्लो होणार असल्याने लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. काल भंडारदरात दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 7 मिमी झाली आहे. निळवंडेतीलही पाणीसाठा हळूहळू वाढत आले. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 48.78 टक्के झाला होता. 1060 दलघफू क्षमतेच्या आढळा धरणातील पाणीसाठा 949 दलघफू (89.53टक्के) झाला आहे. हे धरण आता कोणत्याहीक्षणी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

कोतूळ येथील वार्ताहराने कळविले की, अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग कमी अधिक होत आहे. पाण्याची आवक होत असल्याने 26000 दलूघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा काल 5 वाजता निम्मा झाला होता. सायंकाळी 6 वाजता या धरणातील पाणीसाठा 15652 दलघफू (60.10 टक्के) झाला होता. मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 5327 क्युसेक होता.

गोदावरील विसर्ग घटला
राहाता तालुका प्रतिनिधीने कळविले की,दारणा व अन्य धरणांच्या पाणलोटात पाऊस कमी झाल्याने आवकही घटली आहे. परिणामी गोदावरीतील विसर्ग घटला आहे. दारणातून 2624, भावली 208 कादवा 400 असा एकूण 2759 क्युसेक विसर्ग नांदूर मधमेश्वरमधून गोदावरी नदीत सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या