भंडारादरा /राहाता |तालुका वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी सकाळी धरण 50 टक्के भरले. निळवंडे धरणाचा पाणीसाठा सायंकाळी 6 वाजता 43.08 टक्क्यांवर पोहोचला. पावसाचा जोर कायम राहिला तर दोन्ही धरणे जुलै महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. दरम्यान, दारणा, गंगापूरच्या पाणलोटात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरींचे आगमन होत होते. गोदावरीत काल सायंकाळी 15 हजार 775 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता.
दोन दिवस पावसाचा जोर ओसल्याने धरणांत धिम्या गतीने पाणी येत होते. मात्र, बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत (24 तासात) भंडारदरा धरणात 282 तर निळवंडेत 96 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. याचबरोबर मुळा नदीवरील 191 दलघफू क्षमतेचे आंबित धरण सर्वप्रथम भरल्यानंतर 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण, 183 दलघफू क्षमतेचे कोथळे व 155 दलघफू क्षमतेचे शिरपुंजे धरण आधीच ओव्हर फ्लो झाले आहे. कृष्णावंती नदीवरील वाकी जलाशय व प्रवरा नदीला मिळणार्या टिटवी शिवारातील 303 दलघफू क्षमतेचा टिटवी लघु बंधारा पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून पाणी वाहत आहे. हे पाणी पुढे प्रवरेवरील निळवंडे धरणात येत असून या धरणात नवीन पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.
तसेच आढळा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठाही 83.21 टक्के झाला आहे. दरम्यान, एक आठवड्यापासून घाटघर, रतनवाडी, साम्रद, पांजरे या येथे मुसळधार पाऊस कोसळत असून भात आवणीस लवकरच वेग येणार आहे. तर धरण पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने शाखा अभियंता प्रवीण भांगरे, वसंत भालेराव यांच्यासह जलसंपदा विभाग लक्ष ठेऊन आहे. दरम्यान, 24 तासात भंडारदरा 75 मिमी, घाटघर 89, पांजरे 78, रतनवाडी 101, वाकी 49, निळवंडे 3, अकोले 1 मिमी पावसाची नोंद झाली.
7 टीएमसी जायकवाडीच्या दिशेने
राहाता तालुका प्रतिनिधीने दिलेल्या वृत्तानुसार दारणा धरणाच्या पाणलोटात अधून-मधून पावसाच्या हलक्या सरींचे आगमन होत होते. नवीन पाण्याचे आगमन काहीसे कमी झाल्याने दारणा धरणाचा विसर्ग 3,536 क्यूसेकवर आहे. पाण्याची आवक घटल्याने गंगापूरचा विसर्ग 1,760 क्यूसेकवर स्थिर ठेवण्यात आला आहे. काल दारणा व गंगापूर दोन्ही धरणांच्या परिसरात पावसाचे अधून-मधून आगमन होत होते. काल सकाळपर्यंत दारणा धरणात 261 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. 1 जूनपासून या धरणात 4 टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले आहे. दारणा समूहातील भावली धरण 76.22 टक्के भरले आहे. वाकी 57.66 टक्के, भाम धरणात 57.83 टक्के भरले आहे.
गंगापूर समूहातील गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल हलक्या सरींचे आगमन सुरू होते. काल सायंकाळी 6 वाजता या धरणातून 1,760 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. गंगापूर समूहातील गंगापूरचा साठा 59.01 टक्के, कश्यपी 53.83 टक्के, गौतमी गोदावरी 36.67 टक्के असा पाणीसाठा आहे. अन्य धरणांचा साठा असा – मुकणे 51.11 टक्के, वालदेवी 56.58 टक्के, कडवा 47.10 टक्के, आळंदी 47.06 टक्के, भोजापूर 81.72 टक्के, पालखेड 66 टक्के.
दारणा 3,536, गंगापूर 1,760, कडवा 795, पालखेड 4,338 क्यूसेकने धरणातून पाण्याची आवक सुरू असल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 15,775 क्यूसेकने विसर्ग सुरू होता. काल सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण या बंधार्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 7.7 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
मुळा धरणाचा साठा 42 टक्के
कोतूळ/ राहुरी |वार्ताहर| Kotul
मुळा धरण पाणलोटक्षेत्रातील हरिश्चंद्रगड, आंबित, पाचनई, कोथळा, कोहणे, कोतूळ या भागात पावसाचा जोर टिकून आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने मुळा नदीपात्रातून गुरुवारी सकाळी 3822 क्यूसेसचा तर संध्याकाळी 3416 क्यूसेकने धरणाकडे विसर्ग सुरू होता. गेल्या 24 तासात काल सायंकाळपर्यंत मुळा धरणात 238 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली तर यावर्षी धरणात 2 हजार 803 दलघफू नवीन पाणी आले. 26 टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा 11 हजार 709 दलघफू झाला (42 टक्के) आहे.





