Thursday, September 19, 2024
Homeनगरभंडारदरात धो-धो पाऊस, प्रवरेला पूर

भंडारदरात धो-धो पाऊस, प्रवरेला पूर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात जोरदार पाऊस होत असल्याने हे धरण काल शनिवारी दुपारी 3.30 वाजता पूर्ण क्षमतेने 11039 दलघफू झाले.पाऊस सुरूच असल्याने धरणात पाण्याचे लोंढे जमा होत असल्याने धरणातून 17090 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर विसर्ग आणखी वाढविण्यात आला. हे पाणी निळवंडे धरणातही जमा होत असल्याने या धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. या हंगामात दुसर्‍यांदा पूर आला आहे.

भंडारदरासह पाणलोटात काल सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे पाणलोटातील धबधब्यांनी आक्राळविक्राळ रूप धारण केले. ओढेनाल्यांना पूर आला. धरणात प्रचंड आवक होत असल्याने आलेली आवक प्रवरा नदीपात्रात सोडण्यास सुरूवात झाली. दुपारी 3 वाजल्यापासूनच धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली. दुपारी 3.30 वाजता पूर्ण क्षमतेने 11039 दलघफू भरले. सुरूवातीला 23806 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर सायंकाळी हा विसर्ग कमी झाला तो 18060 क्युसेक होता. हे पाणी निळवंडेत जमा होत असल्याने धरणाचा पाणीसाठा 7560 दलघफू (90.77 टक्के) कायम ठेऊन 22550 क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने प्रवरा नदीला पूर आला आहे. गत 12 तासांत झालेला पाऊस असा-मिमीमध्ये घाटघर 170, भंडारदरा 150, पांजरे 88, रतनवाडी 140.

मुळातून विसर्ग सुरू

कोतूळ |वार्ताहर| Kotul

मुळा पाणलोटातही पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे या धरणातूनही मुळा नदीत 2000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूची नुसार 16 ते 31 ऑगस्ट दरम्यान 24884 दलघफू इतका पाणीसाठा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे काल शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता मुळा धरणातून 1000 क्यूसेक्सने नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर हा विसर्ग 2000 क्युसेक करण्यात आला. सायंकाळी 26000 दलघफू क्षमतेच्या या धरणात 24241 दलघफू पाणीसाठा होता. कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 1633 क्युसेक होता.

सप्टेंबरमध्ये तीन टप्प्यांत मुसळधार बरसणार

जमिनीसह विहीरींच्या जलपातळीत होणार वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सप्टेंबर महिना हा अधिक प्रकाशमान व उष्णतेचा महिना आहे. या काळात मुंबईसह कोकणात 15, नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह 10 ते 12, तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा खांदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असतो. यंदा देखील सप्टेंबर महिन्यांत टप्प्याने मुसळधार पावसाची तीन टप्पे होणार असून यामुळे राज्यातील धरणे ओसांडणार असून नद्या खळखळणार आहेत. एकप्रकारे पावसाच्या या आवर्तनांमुळे जमिनीसह विहीरींच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याचे सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

दरवर्षी राज्यात सप्टेंबर महिन्यांत पावसाचे सरासरी 5 ते 7 असतात. यावर्षी 1 ते 5 सप्टेंबर, 12 ते 16 सप्टेंबर आणि 25 ते 29 सप्टेंबर अशा प्रत्येकी पाच दिवसाच्या तीन आवर्तनातून महाराष्ट्रात अंदाजे 10 ते 15 पावसाळी दिवस राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळ धरणे ओसंडणार असून नद्या खळखळणार आहेत. दुसरीकडे आज (रविवारी) संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा असून त्यानंतर अक्षवृत्तासमांतर दक्षिणोत्तर उतराईकडे जाणारा हवेच्या दाबाच्या ढाळाची (प्रेशर ग्रेडिएन्ट) गैरहजेरीतून आर्द्रतायुक्त पश्चिमी वार्‍यांचा अभावातून आणि वाढणार्‍या एकजिनसी हवेचा दाबातून, सोमवार 26 ते शुक्रवार 30 ऑगस्ट दरम्यानच्या पाच दिवसात कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाची लाट उसळण्याची शक्यता आहे.

त्यानंतर शनिवार 31 ऑगस्ट ते गुरुवार 5 सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात महाराष्ट्रात पुन्हा मध्यम पावसाची शक्यता आहेे. विशेषतः संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक व मुंबई आदी 16 जिल्ह्यात कदाचित एखाद्या-दुसर्‍या दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ खुळे यांनी सांगितले. आज रविवारी रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. रत्नागिरी, पालघर, ठाणे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. कोल्हापूर, नगर, धुळे आणि नंदूरबार तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.

आज अन् उद्या मुसळधार
शनिवार दि. 24 ऑगस्ट सकाळ ते सोमवार दि.26 ऑगस्टच्या सकाळ पर्यंत 48 तासात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः नगर, नाशिक नंदुरबार धुळे जळगांव नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अश्या 14 जिल्ह्यात पुढील 48 तासात अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या