Friday, November 22, 2024
Homeनगरभंडारदरात पाऊस सुरू, वाकी 65 टक्क्यांवर

भंडारदरात पाऊस सुरू, वाकी 65 टक्क्यांवर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचेे पाणी, व्यापार आणि उद्योगांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात काल बुधवारी पावसाचा जोर कमी असला तरी आधी झालेल्या जोरदार पावसामुळे काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत धरणांत नव्याने तब्बल 301 दलघफू पाणी दाखल झाले. सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 255 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यापैैकी 90 दलघफू पाणी वापरले गेले. 165 दलघफू पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळेे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 1959 दलघफू झाला होता.

- Advertisement -

काल दिवसभर अधूनमधून बारीक पाऊस कोसळत होता. परिणामी सायंकाळपर्यंत केवळ 46 दलघफू पाणी दाखल झाले. पण विसर्ग सुरू असल्याने 48 दलघफू पाणी वापरले गेले. त्यामुळे सायंकाळी पाणीसाठा 1957 दलघफू होता. भंडारदरा धरण आणि वाकी तलाव परिसरात दोन दिवस पाऊस झाल्याने 102 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावातील पाणीसाठा काल सायंकाळी 64.21 टक्के (72.34 दलघफू) पुढे गेला होता. भंडारदरात दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद केवळ 5 मिमी झाली आहे. असे असलेतरी सायंकाळी 6.15 वाजेनंतर भंडारदरा पाणलोटात पावसाने काहीसा जोर धरला होता.

पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो; पाणी मुळा धरणाकडे झेपावले

कोतूळ |वार्ताहर| Kotul

अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस झाल्याने 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण अखेर काल पहाटे 5.30 वाजता ओव्हरफ्लो झाले. या धरणातून आता 1393 क्युसेकने पाणी मुळा धरणाकडे झेपावले आहे. आंबित पाठोपाठ आता हे दुसरे धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे आदिवासी भागात डोंगरदर्‍या आता ओल्या चिंब झाल्या आहेत. ओढे नाले खळखळून वाहू लागले आहेत. योग्य पाऊस सुरू झाल्याने भात पिकाच्या लागवडी आता सुरू झाल्या आहेत.

मंगळवारी पहाटेपासूनच पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरला. बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. पिंपळगाव खांड धरण भरल्याने आता 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणाकडे पाणी झेपावले आहे. पावसाचा जोर वाढल्यास मुळा धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू होणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या