Monday, July 8, 2024
Homeनगरभंडारदरा पाणलोटात ‘हत्ती’ ने केली कमाल

भंडारदरा पाणलोटात ‘हत्ती’ ने केली कमाल

वाकी तलाव ओव्हरफ्लोच्या मार्गावर धुण्या पेटू लागल्या, भात आवणीला सुरूवात

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचेे पाणी, व्यापार आणि उद्योगांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात काल बुधवारी पुनर्वसू नक्षत्राच्या हत्ती सरींनी जोर पकडला असल्याने धरणात नवीन पाण्याची आवक वाढू लागली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात रात्री उशीरा पाणीसाठा 2000 दलघफूच्या पुढे सरकला होता. आधी झालेल्या जोरदार पावसामुळे मंगळवार आणि बुधवारी धरणात चांगली आवक झाली. पण बुधवारी रात्रीपासून पावसाचा वेग मंदावल्याने गुरूवारी दुपारपर्यंत पाण्याची आवक कमी होती.

गुरूवारी दिवसभरात केवळ 55 दलघफू पाणी आले. त्यापैकी 48 दलघफू पाणी आवर्तनासाठी वापरले गेले. साठ्यात केवळ 7 दलघफू पाण्याची वाढ झाली. त्यामुळे काल सायंकाळी 6 वाजता भंडारदरातील पाणीसाठा 1962 दलघफू झाला होता. पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने सायंकाळनंतर धरणात नवीन पाण्याची आवक वाढली. परिणामी रात्री उशीरा पाणीसाठा 2000 दलघफूच्या पुढे सरकला होता. काल भंडारदरात दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 20 मिमी झाली आहे.

धुक्यांनी डोंगरदर्‍या लपेटून गेल्या आहेतं. जोरदार सरी कोसळत असल्याने पाणलोटातील जनजीवन गारठु लागल्याने काही ठिकाणी धुण्या पेटण्यास सुरूवात झाली आहे. भात खाचरांमध्ये पाणी साठु लागल्याने घाटघर, उददावणे, पांजरे या भागात भात आवण्यांच्या कामास जोरदार सुरूवात झाली आहे. भंडारदरा धरण आणि वाकी तलाव परिसरात पाऊस झाल्याने 102 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावातील पाणीसाठा काल सायंकाळी 80.38 दलघफू (71.38 टक्के) झाला होता. पावसाचा जोर टिकून राहिल्यास आज उद्या हा तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. हा तलाव भरल्यानंतर निळवंडेत नवीन पाण्याची आवक वाढणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या