भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात दोन दिवस आषाढ सरींनी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काल शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा वाढला, त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची वाढीव आवक सुरू झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 4013 दलघफू (36.35 टक्के) झाला होता. तर 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 30 टक्क्यांवर पोहचला आहे. काल शनिवारीही अधून-मधून पाऊस कोसळत आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसाची भंडारदरातील नोंद 5 मिमी झाली.
भंडारदरा परिसरात पाऊस सुरू असल्याने निळवंडे धरणात नवीन पाणी येत आहे. या धरणात काल 1323 दलघफू पाणीसाठा झाला होता. मुळा पाणलोटात गेल्या तीन दिवसांपूर्वी पाऊस विश्रांती घेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतू शनिवार पहाटेपासून पावसाचे प्रमाण पुन्हा वाढले. परवाच्या तुलनेत काल पावसाचे प्रमाण वाढले. परिणामी सकाळी मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 4705 क्युसेस होता तर सायंकाळी 3416 क्युसेस होता. यामुळे मुळा धरणाकडे पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा 7792 दलघफू (30 टक्के ) झाला आहे. दोन्ही धरणांच्या पाणलोटात पाऊस पुन्हा सुरू झाल्याने भातखाचरांमध्ये पाणी साठू लागल्याने भात आवणीच्या कामाने पुन्हा वेग घेतला आहे.
गंगापूरच्या पाणलोटात दमदार पाऊस
आंबोलीला 104 मि.मी., दारणा 35, भावली 46 टक्के तर गंगापूर 29 टक्क्यांवर
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
गंगापूर धरणाच्या पाणलोटातील अंबोली येथे 24 तासात 104 मि.मी. पावसाची नोंद झाली. गंगापूर धरण 29 टक्क्यांवर पोहचले. दुसरीकडे दारणाच्या पाणलोटात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. दारणा 35 टक्क्यांवर तर भावली धरण 46 टक्क्यांवर पोहचले आहे. शनिवारी गंगापूर धरणाच्या पाणलोटात पावसाने चांगलेच मनावर घेतले. गंगापूर धरणाच्या भिंतीजवळ 40 मि.मी., गौतमी गोदावरीला 57 मि.मी., कश्यपीला 18 तर पाणलोटातील त्र्यंबक येथे 31 मि.मी. तर आंबोली येथे 104 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात गंगापूर धरणात 55 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.
5630 क्षमतेच्या या धरणात 1633 दलघफू पाणीसाठा तयार झाला आहे. कश्यपीत 6.97 टक्के, गौतमी गोदावरी 19.38 टक्के, आळंदी 2.38 टक्के इतका पाणीसाठा आहे. दारणाच्या पाणलोटात काल सकाळपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस होता. पाणलोटातील इगतपुरी येथे 35 मि.मी., घोटी येथे 29 मि.मी. तर दारणाच्या भिंतीजवळ 8 मि.मी. पावसाची नोंद झाली. दारणात काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात 50 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे धरण 35.04 टक्क्यांवर पोहचले आहे. भावलीला 53 मि.मी.पावसाची नोंद झाली. हे धरण 45.96 टक्क्यांवर पोहचले आहे. या धरणात 24 तासात 37 दलघफू नवीन पाणी 24 तासात दाखल झाले. वाकीला 22 मि.मी., भामला 28 मि.मी., कडवाला 3 मि.मी. असा पाऊस नोंदला गेला. मुकणे 9.77 टक्के, वाकी 5.02 टक्के, भाम 38.47 टक्के, वालदेवी 15.53 टक्के, कडवा 27.96 टक्के, आळंदी 2.38 टक्के असा पाणीसाठा आहे.
गोदावरीतील विसर्ग बंद
दरम्यान गेल्या 15 दिवसांपासून नांदूरमधमेश्वर बंधार्यात नाशिक तसेच निफाड तालुक्यातील पावसाने नवीन पाणी दाखल होत होते. गेल्या 15 दिवसापासून या बंधार्यातून गोदावरी नदीत 200 क्युसेकने विसर्ग सुरु होता. परवा शुक्रवारी या बंधार्याची लेव्हल कमी झाल्याने गोदावरीतील विसर्ग बंद करण्यात आला आहे. गोदावरी नदीतील विसर्गाचे पाणी पुणतांब्यापर्यंत पोहचले होते.