Saturday, May 25, 2024
Homeनगरभंडारदरा तुडूंब !

भंडारदरा तुडूंब !

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा शनिवारी सायंकाळी 10654 दलघफू (96.51 टक्के) झाला आहे. पाणलोटात पाऊस काहीसा वाढल्याने आज-उद्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

निळवंडेत काल सायंकाळी 6965 दलघफू पाणीसाठा होता. या धरणातून प्रवरा नदीपात्रात 1525 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

पाणलोटात पाऊस कमी झाल्याने चारपाच दिवसांपासून आवक कमालीची घटली होती. पण कालपासून पावसाचा जोर काहीसा वाढलेला आहे. त्यामुळे भंडारदरात 156 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 10654 दलघफू (96.51 टक्के) झाला आहे. भंडारदरात काल दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या. या पावसाची नोंद 21 मिमी झाली आहे.

पाणलोटात पाऊस काहीसा वाढल्याने आज-उद्या हे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे (11039 दलघफू) तुडूंब भरण्याची शक्यता आहे. पाणलोटातील पाऊस कमी झाल्याने भात पिके संकटात येतात की काय अशी स्थिती होऊ लागली होती. पण कालपासून पाऊस पुन्हा पडता झाल्याने या भागातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

मुळा पाणलोटातून पावसाने काढता पाय घेतला आहे. असे असलेतरी कोतूळ येथील मुळेचा विसर्ग 1753 क्युसेक आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 20051 दलघफू झाला होता.

दरम्यान, जिल्ह्यातून पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या काही शेतकरी तुषार पध्दतीने पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या